ड्रोनद्वारे आणले शस्त्र, आयएसकेपीशी फोनवर संपर्क
अहमदाबाद : प्रसादात विष कालवून लक्षावधी लोकांचा बळी घेण्याचे षडयंत्र रचणाऱ्या डॉ. अहमद सैयद आणि त्याच्या सहकाऱ्यांना गुजरात एटीएसने अटक केलीय. तपासात समोर आले आहे की हे तिन्ही जण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आयएसकेपीशी जोडलेले होते. डॉ. सईदने विष बनवण्याची आणि पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे शस्त्र मागवल्याचे कबुल केले आहे.
गुजरात एटीएसने हैदराबादच्या डॉ. अहमद सईद याच्यासह ३ संशयितांना ताब्यात घेतले होते. या सर्वांवर देशात राहून भारताविरुद्ध दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे. यापैकी सर्वात धोकादायक कट डॉ. सईदचा होता. तो मंदिरातील प्रसाद आणि पाण्यात विष मिसळून एकाच वेळी लाखो लोकांना मारण्याची तयारी करत होता. यासाठी डॉ. सईद रायसिन नावाचे प्राणघातक विष बनवत होता. आता त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. गुजरात एटीएसच्या तपासात उघड झाले की डॉ. सईदसह सर्व ३ संशयित पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान प्रॉव्हिन्सशी (आयएसकेपी) संबंधित होते.
डॉ. अहमद सईद, आझाद शेख आणि मोहम्मद सलीम खान हे तिघेही आयएसकेपीसाठी बराच काळ भारतात सक्रिय होते. ते एरंडीच्या तेलापासून अत्यंत घातक विष तयार करत होते. हे विष अन्नपदार्थांमध्ये, पेयांमध्ये किंवा वायूच्या स्वरूपातही वापरता येते.डॉ. सईद हा ६ भावंडांमध्ये सर्वात धाकटा आहे. त्याने आपल्या कुटुंबीयांना अनेक वर्षांपासून अंधारात ठेवले होते. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर त्याने सर्वांना सांगितले होते की तो गुजरातमध्ये व्यवसाय करतो. परंतु व्यवसायाच्या आड लाखो भारतीयांवर भीषण हल्ला करण्याचा कट तो रचत होता.
गुजरात एटीएसच्या तपासात असेही उघड झाले की डॉ. सईद बऱ्याच काळापासून आयएसकेपीचा हँडलर अबू खलीजा याच्याशी फोनवर संपर्कात होता. त्याने पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे राजस्थानच्या सीमेवर ३ पिस्तुले आणि ३० काडतुसे मागवली होती. आयएसकेपीने ती डॉ. सईदपर्यंत पोहोच केली. या शस्त्रसाठ्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एटीएसने डॉ. सईद हत्यारे घेऊन परतताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. कठोर चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.