नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल स्पष्ट होताच भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि देशाला संबोधित केले.
एनडीएच्या भक्कम कामगिरीनंतर आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी बिहारमधील नागरिकांचे मनापासून आभार मानले. मतदारयादीच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मोहिमेला सर्वपक्षीय सहकार्य मिळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी विरोधकांवरही टोला लगावत मतदारांच्या जागरूकतेचे कौतुक केले.
मोदी म्हणाले की, “या वेळी दोन टप्प्यात मतदान झाले, पण कुठेही पुनर्मतदानाची वेळ आली नाही. हे शांततापूर्ण मतदानासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, सुरक्षा दलांचे आणि जागरूक मतदारांचे यश आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो.”
पंतप्रधानांनी सांगितले की बिहारने मतदारयादी सुधारण्याच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देऊन लोकशाहीची पवित्रता जपली आहे. “आता प्रत्येक राजकीय पक्षाने बूथवर संघटनांना सक्रिय करून हे काम पुढे न्यायला हवे. जेणेकरून देशभरात मतदारयादी अधिक पारदर्शक बनेल,” असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले, “लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारने आज पुन्हा एकदा खोट्या राजकारणाला धडा शिकवला. जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की जामिनावर बाहेर असलेल्या नेत्यांना ते साथ देणार नाहीत.”
ते पुढे म्हणाले, “आज भारत खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे, जिथे प्रत्येक कुटुंबाला समान संधी, सन्मान आणि विकासाचा मार्ग खुला आहे. फक्त तात्पुरते खुश करणे नाही, तर लोकांच्या मनात खरी समाधानाची भावना निर्माण करणे हेच जनतेला अपेक्षित आहे."
बिहारमधील कथाकथित ‘जंगलराज’चा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “हा विजय त्या माताभगिनींचा आहे ज्यांनी त्या काळात भीतीचे दिवस पाहिले आहेत, आणि त्या तरुणांचा आहे ज्यांचे भविष्य हिंसाचाराने प्रभावित झाले होते. आता बिहार विकासाच्या दिशेने धावत आहे आणि ही प्रगती थांबणार नाही.”