मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X), फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्क्रोल केलं असेल, तर तुम्हाला 'निळ्या साडी वाली' महिला नक्कीच दिसली असेल. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून, मराठी आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले आहे!
सिडनी स्वीनी आणि मोनिका बेलुचीशी तुलना
सोशल मीडियावर अनेक चाहते गिरिजा ओक यांची तुलना थेट अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी (Sydney Sweeney) आणि इटालियन मॉडेल मोनिका बेलुची (Monica Bellucci) यांच्याशी करत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांना "भारताचा जवाब" आणि लेटेस्ट 'नॅशनल क्रश' म्हणून संबोधले जात आहे. या अचानक आलेल्या लोकप्रियतेबद्दल आणि पहिल्यांदा व्हायरल होण्याबद्दल बोलताना गिरिजा ओक यांनी एका मुलाखतीत आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "मी आश्चर्यचकित झाले आहे! रविवारच्या संध्याकाळी माझा फोन सातत्याने वाजत होता. मी माझ्या नाटकाची तालीम करत असल्यामुळे कॉल उचलू शकत नव्हते. अचानक माझे सर्व मित्र मला मेसेज करू लागले, 'तुला माहित आहे का एक्सवर काय चाललंय?'"
गिरिजा यांनी पुढे सांगितले, "एका मित्राने मला एक पोस्ट पाठवली, ज्यात ही अभिनेत्री प्रिया बापट आहे की मी, यावर वाद सुरू होता! त्यानंतर माझ्या दीराने मला सांगितले की, काही हलक्या दर्जाच्या हँडल्सनी माझे फोटो घेतले आणि 'भाभी प्रेमी' सारखे संपूर्ण दृश्य सुरू आहे. काही पेजेसनी तर मला कामुक बनवले." मात्र, अशा नकारात्मक गोष्टींकडे गिरिजा यांनी सहजतेने पाहिले. त्या म्हणाल्या, "जे काम मी करते, ते तसेच राहणार आहे. लोकांना आता जर माझे काम कळत असेल, तर मला आनंदच आहे." विशेष म्हणजे, मीम्सचा पाऊस पडत असतानाही त्यांचे कुटुंब या गोष्टीने परेशान झाले नव्हते. दुसरीकडे, त्यांच्या मराठी चाहत्यांनी, "तुम्ही तिला आत्ता शोधले! आम्ही तिला वर्षांपासून ओळखतो," अशी प्रतिक्रिया देत आपला आनंद व्यक्त केला आहे.