भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा जिल्ह्यात महायुतीचे खासदार आणि चार आमदार असून येणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे २० ते २२ नगरसेवक आणि महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. भाजपाचे उत्तर पश्चिमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी संकल्प जाहीर केला असून दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी या जिल्ह्यात काही करिष्मा करू शकणार नाहीत, असाही टोला त्यांनी दैनिक प्रहारशी बातचित करताना मारला.
भाजपाने उत्तर पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांची नियुक्ती केली. महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक तसेच संघटन कौशल्य असल्याने पक्षाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याशी विविध प्रश्नांच्या माध्यमातून मते जाणून घेण्यात आली आहेत. आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना अॅड ज्ञानमूर्ती शर्मा सांगतात की, १९९२ची जातीय दंगल ही मला राजकारणात येण्यास प्रवृत्त करणारी ठरली. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ज्याप्रकारे मित्र असणारे मुस्लिम बांधव दुश्मनासारखे वागू लागले, तेव्हा आपण आपल्या धर्मासाठी का जगू नये, याच विचारामुळे मी भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेमध्ये सामील झालो. भाजपाचे काम करताना सुरुवातीला मी युवा मोर्चाच्या माध्यमातून काम केले. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेसाठी काम करत त्यांच्या केसेस लढण्याचे काम पाहिले. दहा ते बारा वर्षे मी व्हीएचपीचे काम पाहिले. हिंदू विरोधी जे नेते होते, त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला चालवला जात होता, त्यांचे काम पाहत होतो. त्यानंतर २००३मध्ये भाजपाचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली.
पुढे २००७ सालामध्ये मालाड येथील प्रभाग हा ओबीसी आरक्षित झाला आणि पक्षाने माझ्या नावाचा विचार केला. त्यामुळे सन २००७ -२०१२ आणि सन २०१२-२०१७ सलग दोन वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलो. सन २०१७ -२२ हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने माझ्या पत्नीला उमेदवारी मिळाली आणि संगीता शर्मा निवडून आल्या. त्यामुळे माजी असल्याने माझा विचार झाला असला तरी मी पूर्वी उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद भुषवले होते आणि त्यानंतर माझ्यावर मुंबई उत्तर भारतीय मोर्चा मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आता माझ्याकडे मुंबई सचिव आणि उत्तर पश्चिम विभागाचा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून कोणती पावले उचलली याबाबत सांगतांना ते म्हणतात, उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रामध्ये उत्तर भारतीय आणि कोकणी समाजाची जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकद कुठे कमी आहे याची माहिती घेण्याचे काम आहे. कोकणी माणसांचे भाजपाला सहकार्य आहे, त्यामुळे ते अधिक सहकार्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत संघटनात्मक बैठकांच्या दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यात ज्या त्रुटी दिसत आहे, त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
जिल्ह्यात पक्षाच्यावतीने राबवलेल्या योजना, कार्यक्रम तसेच शिबिर यांची माहिती देताना ज्ञानमूर्ती शर्मा सांगतात की, नमो नेत्र चिकित्सा शिबिर कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्यात ३९ प्रभागांमध्ये ४५ ठिकाणी याबाबतचे कार्यक्रम घेतले. त्यात शिबिरात सहभागी झालेल्यांना २२ हजार ८०० जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ४० जणांना मोतिबिंदूचे निदान झाले असून त्या सर्वांवर केईएम रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत.
उत्तर पश्चिम जिल्ह्यातील नगरसेवक संख्या वाढवण्याचा आणि किती नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प आहे याबाबत विचारले असतो ते सांगतात की, या जिल्ह्यात चार महायुतीचे आमदार आहेत, एक उबाठा आणि एक काँग्रेसचा आहे. त्यातच विधान परिषदेचे सदस्य राजहंस सिंह हे दिंडोशी मतदार संघातील आहेत. तसेच या जिल्ह्यात एकूण ३९ नगरसेवकांचे प्रभाग आहेत. त्यातील भाजपाचे १८ नगरसेवक आहे, ज्यांची संख्या वाढवून २० ते २२ एवढी केली जाईल. या जिल्ह्यात शिवसेनेचे १३ नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचा परिणाम या जिल्ह्यात काय होईल याबाबत अॅड ज्ञानमूर्ती शर्मा सांगतात, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर केवळ एक ते दोन प्रभागांमध्ये परिणाम होईल. आणि तेही जोगश्वरी आणि दिंडोशी मतदार संघात होईल. या जिल्ह्यात ४० टक्क्यांहून अधिक उत्तर भारतीय जनता आहे. मनसेच्या विरोधात ही जनता आहे. त्यामुळे आता उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी परप्रांतिय हा मुद्दा बाजुला करून मनसेने मारवाडी जैन लोकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पण मनसेचा परप्रांतियांनाच विरोध आहे हे जाहीर होत असून मराठी जनतेचाही आता मनसेवरील विश्वास उडत चालला आहे आणि उबाठा शिवसेनेवरीलही.
या जिल्हयात करण्यात आलेल्या आणि होऊ घातलेल्या विकासकामांमध्ये बोलतांना ते सांगतात की, विलेपार्ले येथील गोखले रोड कुणाच्या अथक पाठपुराव्यामुळे झाले हे सर्वांना माहीत आहे. आमच्या पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आमदार म्हणून जातीने लक्ष घालून हे पूल नियोजित वेळेत करून घेण्याचा प्रयत्न केला, हे या विभागातील कोणतीही जनता मान्य करेल. कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पाचा तर सातत्याने आढावा घेतला जात आहे. तसेच या प्रकल्पांमुळे कुणी विस्थापित होऊ नये याची काळजी घेतानाच हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्नही होत आहे. एसआरए अंतर्गत प्रकल्पांमध्ये काही प्रकल्प धिम्या गतीने सुरु आहेत, तर काही बंद आहेत. तेथील भाडेकरुंना भाडे दिले जात नाही. उपनगराचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या जनता दरबारमध्ये याच समस्या मोठ्या प्रमाणात मांडल्या जात असल्याने झोपडीधारकांना विकासकाकडून थकीत भाडे मिळणे हा त्याचा अधिकार असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
वाहतूक कोंडी हा मुख्य प्रश्न या जिल्ह्यात आहे. कांदिवली पूर्व भागातील बॉटलनेक काढून महिंद्रा अँड महिंद्राच्या आतून फिल्मसिटीला जोडणारा १२० फुटांच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. फिल्मसिटी ते मागाठाणे या दोन ते तीन ठिकाणी काम थांबलेले आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकरजी आणि राजहंस सिंह हे यासाठी प्रयत्न करत आहेत. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे कामही सुरु आहे. त्यामुळे मुलुंडला २० मिनिटांमध्ये जाता येईल. याशिवाय मोतीलाल नगरचा पुनर्विकास होत आहे. येथील प्रत्येक भाडेकरुला १६०० चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. त्यामुळे लोकांना एकप्रकारे या प्रकल्पांतून फायदाच होणार आहे.
आज या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच विकास करू शकते हे जनतेला आता कळून चुकले आहे. या दोन्ही विकास पुरुषांनी मेट्रो रेल्वेचे भूमिपुजन केले आणि त्यांच्या लोकार्पणाची फितही त्यांनीच कापली. आज भूमिगत मेट्रोतून दिवसाला दीड लाख प्रवाशी प्रवास करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकप्रकारे मुंबईला वैश्विक दर्जा प्राप्त करून दिला असे म्हटले तर खोटे ठरणार नाही,असे त्यांनी शेवटी नमुद केले