मुंबई : माहिम खाडीजवळ घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मोबाईलवरील फोटो आणि मेसेजवरून झालेल्या वादातून एक 19 वर्षीय ट्रान्सजेंडरने खाडीत उडी घेतली, तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या मित्राचाही जीव गेला. अग्निशामक दलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना आज दुपारी साडेबारा सुमारास घडली. वांद्रे लालमट्टी येथील रहिवासी कलंदर अल्ताफ खान (21) आणि ट्रान्सजेंडर इरशाद उर्फ झारा (19) यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, आणि ते अलीकडेच भासड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. पोलीस सूत्रांच्या मते झाराला कलंदरच्या मोबाइल मध्ये दुसऱ्या मुलीचे फोटो आणि चॅट्स सापडले यावरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. वाद सुरू असतानाच झाराने अचानक माहिमच्या खाडीजवळ स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि पाण्यात उडी घेतली. तिच्या मागे कलंदरनेही तिला वाचवण्यासाठी उडी मारली, मात्र दोघेही बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. दोन तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या शोधानंतरही दोघांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत . स्थानिक नागरिकांनीही या बचावकार्यात मदत केली, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.
झाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कलंदर तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा आणि ती याआधी तीन वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.