मुंबई: भारताचा रोजगार बाजार ज्या वेगाने विकसित होत आहे त्या वेगाने देशातील कौशल्यसंपन्न मनुष्यबळ विकसित होत नाही असा तज्ञांचा कयास आहे. अशा परिस्थितीत टीमलीज एडटेकने देशाला केवळ बेरोजगारीच्या आकड्यांकडे न पाहता त्याहूनही गंभीर अशा वाढत्या कौशल्य-अभावाच्या (Skillgap) समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. या ध्येयाला पुढे नेत कंपनीने ‘मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स २०२५’ या उपक्रमाचे तिसरा टप्पा मुंबईत आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमात शिक्षण, उद्योग, धोरणनिर्मिती आणि समाजसेवा या क्षेत्रांतील विविध मान्यवर एकत्र आले होते. रोजगारक्षमतेची उभारणी ही एकाकी प्रयत्नांमधून साध्य होत नाही तर ती व्यक्ती, संस्था आणि समुदाय यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच शक्य असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
परिणामांना गती देत, स्वप्नांना बळ ही या वर्षीची थीम होती. देशभरात कौशल्यांची उपलब्धता वाढवून शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरवण्यात आले. मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स २०२५ च्या आवृत्तीमध्ये रोजगारक्षमतेच्या वाढीसाठी तळागाळात थेट योगदान देणाऱ्या १२२ व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. वर्गखोल्या कौशल्य प्रयोगशाळांमध्ये रूपांतरित करणाऱ्या शिक्षकांपासून ते कार्यस्थळी शिकण्याच्या संकल्पनेची नव्याने व्याख्या करणाऱ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकाची कहाणी ही कार्यक्षम आणि उद्देशपूर्ण भारताच्या निर्मितीकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरली.
टीमलीज एडटेकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू रूज यांनी सांगितले की,'खरी समस्या ही बेरोजगारीची नाही, तर रोजगारक्षमतेच्या अभावाची आहे. मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम किंवा मोहिम नाही; ती एक चळवळ आहे. आपल्या तरुणांना अर्थपूर्ण रोजगारासाठी तयार करण्याची जबाबदारी ही शिक्षक, नियोक्ते, धोरणकर्ते आणि नागरिक म्हणून प्रत्येकाची म्हणजेच आपणा सर्वांची आहे.''आज ज्या प्रत्येक व्यक्तीचा आपण गौरव करतो, ती दाखवते की जेव्हा उद्देश कृतीत उतरतो तेव्हा काय साध्य होऊ शकते'असे रूज यांनी पुढे सांगितले.यापुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की,'जर प्रत्येक नागरिकाने कौशल्यविकास किंवा मार्गदर्शनाच्या दिशेने अगदी छोटं पाऊल उचललं, तरी आपण देशातील कामगारशक्तीची कहाणी पुढील अनेक पिढ्यांसाठी बदलू शकतो.'
'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील रोजगारक्षमता ही तुम्हाला काय माहीत आहे यावर अवलंबून नसून, तुम्ही किती वेगाने शिकू शकता यावर अवलंबून आहे' असे डॉ. रघुनाथ ए. माशेलकर यांनी सांगितले आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे की,'ही तुमच्या अनुकूलता गुणांकावर आधारित आहे. जग बदलण्याआधी स्वतःला बदलण्याच्या तुमच्या क्षमतेवर तुम्ही विश्वास ठेवा ही अनुकलता तुमच्या कुतूहल आधारित गुणांकावर अवलंबून आहे म्हणजेच शोध घेण्याची आणि प्रश्न विचारण्याची तुमची जिज्ञासा व ओढ ही महत्वाची आहे.' भारत ‘विकसित भारत २०४७’ या आपल्या दृष्टीकोनाकडे वाटचाल करत असताना 'मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल' हा एकत्रित व्यासपीठ म्हणून सतत विकसित होत आहे. जे केवळ बदल ओळखत नाही तर त्याला प्रेरणाही देते. मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून टीमलीज एडटेकचे उद्दिष्ट हे सन्मानाला गतीमध्ये रूपांतरित करण्याचे आहे ज्यायोगे प्रत्येकाला भारताला खऱ्या अर्थाने रोजगारक्षम बनविण्याच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते.






