Thursday, March 26, 2026

अभिनेते प्रेम चोप्रा रुग्णालयात दाखल; तब्येतीबाबत महत्वाची माहिती

अभिनेते प्रेम चोप्रा रुग्णालयात दाखल; तब्येतीबाबत महत्वाची माहिती

मुंबई : सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एक ज्येष्ठ कलाकार रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या जावयाने, अभिनेता विकास भल्ला यांनी माहिती दिली असून त्यांनी सांगितलं की प्रेम चोप्रा यांची तब्येत पूर्णपणे स्थिर आहे आणि चिंता करण्यासारखं काहीही कारण नाही. काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. वयोमानामुळे हे फक्त एक नियमित तपासणीचं कारण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रेम चोप्रा यांनी आपला ९०वा वाढदिवस २३ सप्टेंबर रोजी साजरा केला होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वयोमानानुसार येणाऱ्या आरोग्याच्या काही किरकोळ तक्रारींमुळे त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणलं होतं, मात्र आता उपचारासाठी त्यांना तात्पुरते दाखल करण्यात आलं आहे.

प्रेम चोप्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय खलनायकांपैकी एक मानले जातात. त्यांनी ‘उपकार’, ‘बॉबी’, ‘दो अनजाने’, ‘क्रांती’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. तब्बल ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून, २०२३ मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

लाहोरमध्ये जन्मलेल्या प्रेम चोप्रा यांनी करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. त्यानंतर काही पंजाबी चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘शहीद’ या चित्रपटातून त्यांना पहिली मोठी भूमिका मिळाली. पुढे ‘उपकार’ आणि ‘बॉबी’सारख्या चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. खलनायकाच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा’ हा त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे.

राजेश खन्नासोबत तब्बल वीसहून अधिक चित्रपट

प्रेम चोप्रा यांनी राजेश खन्नासोबत तब्बल वीसहून अधिक चित्रपट केले आहेत. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगितलं जात आहे.

Comments
Add Comment