मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. लवकरच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य चर्चेत आहे. वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नेमके काय म्हणाले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ?
'आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही. मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ. मुंबईत काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू' असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. याआधी काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढेल, असे संकेत दिले होते.
भाई जगताप आणि विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.