मुंबई (खास प्रतिनिधी) : न्यू माहीम महानगरपालिका मराठी माध्यमाची शालेय इमारत धोकादायक दाखवून ती पाडली जाते. या ठिकाणी शालेय इमारती ऐवजी खासगी विकासकामार्फत पुनर्विकास करून ही शालेय इमारत गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप होत असतानाच या ठिकाणी महानगरपालिकेमार्फतच पुनर्बांधणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट करत महापालिकेने याठिकाणी खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी केली जाणार नाही अथवा कोणतेही खासगीकरण विचाराधीन नाही, असेही स्पष्ट केले.
मुंबई महापालिका शिक्षण विभाग आणि शाळा पायाभूत सुविधा कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये ही इमारत सी वन श्रेणीत म्हणजेच अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली. असे असले तरी पालक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे त्रयस्थ सल्लागार संस्थांमार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले.
मात्र,या संरचनात्मक लेखापरीक्षणात ही इमारत 'अतिधोकादायक' असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन महानगरपालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने ही शालेय इमारत अतिधाेकादायक असल्याबाबतचे आदेश दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेची न्यू माहीम शाळा विविध भाषिक आहे. केवळ मराठी माध्यमाची नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने या शालेय इमारतीतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत नियोजनबद्ध स्थलांतरण करण्यात आले आहे. सर्व शालेय विद्यार्थ्यांचे पर्यायी व्यवस्थेत स्थलांतरण करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असे म्हणणे योग्य ठरत नाही.
ज्या ठिकाणी न्यू माहीम शाळेची इमारत आहे, त्याच ठिकाणी इमारतीची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या जमिनीचा वापर केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठीच केला जाणार आहे. तसेच, या शालेय इमारतीची बांधणीही महानगरपालिकेमार्फत केली जाणार आहे. खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी केली जाणार नाही अथवा कोणतेही खासगीकरण विचाराधीन नाही, हेही प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
माहीम मोरी शालेय इमारत पुनर्बांधणीची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. त्याची निविदा प्रकाशित झाली आहे. नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्यात येतील.