अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस पदवी असलेल्या एका डॉक्टरसह तीन जणांना अटक केली आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी रविवारी या कारवाईची माहिती दिली. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला हा डॉक्टर अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक मानले जाणारे रासायनिक विष 'रायसिन' (Ricin) तयार करण्याच्या प्रयत्नात होता. या डॉक्टरचा हँडलर हा 'इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत' (ISK-P - Islamic State Khorasan Province) या कुख्यात दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. चीनमधून एमबीबीएसची पदवी घेतलेला हा डॉक्टर दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावरून हे षडयंत्र रचत होता. दहशतवादी हल्ल्यांसाठी 'रायसिन' या घातक विषाचा वापर करण्याची त्यांची योजना होती. या तिघांना अटक करून एटीएसने वेळेत केलेल्या कारवाईमुळे गुजरातसह देशातील अनेक भागांत होणारा संभाव्य मोठा घातपात टळला आहे. एटीएस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधले जात आहे.
सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल अखेर रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला ...
डॉक्टरच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा
गुजरातमध्ये घातपाताच्या मोठ्या कटात सहभागी असलेल्या डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक करून मोठी कारवाई केली आहे. रायसिनसारखे घातक रासायनिक विष तयार करण्याच्या तयारीत असलेल्या या डॉक्टरला शस्त्रास्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरात एटीएसचे पोलीस उप महानिरीक्षक सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने ७ नोव्हेंबर रोजी ही कारवाई केली. तेलंगणमधील हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या डॉ. सय्यद याला गांधीनगरमधील अदलाज जवळून अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला साठा पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्या. त्याच्याकडून दोन ग्लॉक पिस्तूल, एक बेरेटा पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि चार लिटर एरंडेल (Caster Oil) जप्त करण्यात आले. डीआयजी जोशी यांनी पत्रकारांना सांगितले की, रायसिन हे एक अत्यंत धोकादायक रासायनिक विष आहे, जे एरंडाच्या बियांवर प्रक्रिया करून उरलेल्या टाकाऊ पदार्थांपासून बनवता येते. डॉ. सय्यद याने रायसिन निर्मितीसाठी आवश्यक असलेले संशोधन आधीच सुरू केले होते. त्याने उपकरणे आणि कच्चा माल खरेदी करून प्राथमिक रासायनिक प्रक्रियाही सुरू केली होती. इतकेच नाही, तर तो दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याची आणि तरुणांना भरती करण्याची योजनाही आखत होता. एटीएस आता या दहशतवादी रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा तपास करत आहे.
'ड्रोन'द्वारे शस्त्रांचा पुरवठा, आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड
डॉ. सय्यद याच्या मोबाइल फोनमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने तत्काळ कारवाई करत, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या अन्य दोन आरोपींना अटक केली. डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, या दोघांना बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आले. त्यांनी राजस्थानमधील हनुमानगड येथून शस्त्रे खरेदी करून ती डॉ. सय्यदला पुरवली होती. एटीएसने त्यांच्या ताब्यातून तीन मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉपही जप्त केले आहेत. डॉ. सय्यदने चौकशीत केलेल्या खुलाशानुसार, या कटाचा मुख्य हँडलर अबू खादीजा हा अफगाणिस्तानचा रहिवासी आहे. तो पाकिस्तान सीमेवरून ड्रोनद्वारे शस्त्रांचा साठा पाठवत होता. सय्यदने चौकशीत उघड केले की, तो गांधीनगर जिल्ह्यातील कलोल येथील एका निर्जन ठिकाणाहून शस्त्रे गोळा करून दहशतवादी कारवायांचा कट रचत होता. सय्यद पाकिस्तानातील अनेक व्यक्तींच्या संपर्कात होता, ज्यामुळे या रॅकेटची पाळेमुळे अधिक खोलवर असल्याचे स्पष्ट होते. एटीएसने या तिन्ही आरोपींवर यूएपीए भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. डॉ. सय्यदला पुढील तपास आणि चौकशीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ल्यासाठी लखनौ, दिल्ली, अहमदाबादमध्ये 'रेकी'
एटीएसच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी शस्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आले होते. शस्त्रे प्राप्त करून, घातपाती कारवायांसाठी वापरण्याची त्यांची योजना होती. या आरोपींनी दहशतवादी हल्ल्यांसाठी खालील तीन महत्त्वाच्या शहरांमधील सार्वजनिक ठिकाणांची पाहणी (रेकी) केली होती. लखनौ (Lucknow), दिल्ली (Delhi), अहमदाबाद (Ahmedabad) या शहरांमधील गर्दीची ठिकाणे किंवा संवेदनशील आस्थापना त्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एटीएस आता या रेकी केलेल्या ठिकाणांच्या तपशिलांची अधिक कसून चौकशी करत आहे, जेणेकरून या कटामागील पूर्ण योजना आणि उद्देश समोर येईल.