गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण पचण्यास हलके असल्यामुळे आता अनेकजण शाकाहाराकडे वळले आहेत. मात्र भारतामध्ये असे एक शहर आहे, जे जगातले पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषीत झाले आहे.
गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील 'पालीताना' या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे पालीताना हे जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. यामुळे पर्यटनासाठी पालीताना येथे जाणाऱ्या लोकांना आता केवळ शाकाहारी खावे लागणार असून स्थानिक लोकांनीसुद्धा शाकाहाराला पसंती दिली आहे.
पालीताना शहर संपूर्णत: शाकाहारी करण्यामागे धार्मिक श्रद्धा महत्वाची मानली जात आहे. या शहरात जैन धर्मियांचे एक तिर्थस्थान आहे. देश आणि जगभरातील जैन धर्माच्या लोकांसाठी हे एक महत्वाचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे जैन मुनींनी या शहरात मांसाहार करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभुमीवर हे शहर शाकाहाराकडे वळले आहे.
गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर असणाऱ्या पालीताना शहरात मासांहारावर बंदी घालण्यासाठी २०१४ पासून जैन मुनींनी उपोषण केले होते. यात कत्तलखान्यांना बंद करण्याची मागणी होती. जैन धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी सरकारने मांस,अंडी विक्री आणि पशुवधावर प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर नियम तोडल्यावर दंडाची तरतूद केली.