काव्यात रंगलेले ‘कुटुंब’ आणि प्रयोगातला ‘तो बॉक्स’...!

राजरंग - राज चिंचणकर

कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कवितांचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या गावोगावी भ्रमंती करणारा अवलिया म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी विसुभाऊ बापट. या कार्यक्रमाचे तीन हजारांहून अधिक प्रयोग करत, त्यांनी निरनिराळ्या कवींच्या कविता महाराष्ट्रदेशी पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करून ठेवले आहे. त्यांचा हा सगळा प्रवास रंजक असला, तरी सहजसोपा नव्हता. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी हे 'कुटुंब' मोठे केले आणि या कुटुंबाशी तमाम रसिकजनांना जोडून घेतले. आता 'कुटुंब रंगलंय काव्यात'चे असंख्य प्रयोग झाले असताना, या भ्रमंतीमुळे विविध प्रकारच्या आठवणींची शिदोरी विसुभाऊ बापट यांच्याकडे जमा झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी 'राजरंग' कॉलमसाठी सांगितलेली एक खास आठवण; जिथून त्यांच्या या प्रवासाला 'अर्थगती' प्राप्त झाली...


श्रीरामपूर या शहरात माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही घटना घडली. १९८३ या वर्षी श्रीरामपूर येथे माझे कार्यक्रम सुरू होते. तिथे माझे एक मित्र होते, चंद्रनिवास दायमा. त्यांच्याबरोबर एक व्यक्ती मला तिथे भेटायला आली. चंदूने त्यांची ओळख करून दिली, “बापट सर, हे म.कृ.आगाशे. ज्या शाळेत परवा आपला शालेय कार्यक्रम झाला; त्या शाळेत हे मराठीचे शिक्षक आहेत. शिवाय श्रीरामपूर इथल्या प्रसिद्ध अशा लोकमान्य टिळक वाचनालयाचे ते ट्रस्टी म्हणूनही काम पाहतात. त्यांना तुमच्याशी काही बोलायचे आहे". आगाशे सरांशी परिचय झाल्यावर ते मला म्हणाले, "बापट सर, श्रीरामपूर परिसरात तुमचे बरेच कार्यक्रम झाले आहेत. या कार्यक्रमांना प्रसिद्धी सुद्धा खूप मिळाली आहे. तेव्हा आता आमच्या वाचनालयाच्या मदतीसाठी आपला 'कुटुंब रंगलंय काव्यात' हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करु या का...? आमच्या वाचनालयाचे रसिक वाचक तिकिटे घेतीलच. आम्ही तुम्हाला मानधन म्हणून पाचशे रुपये देऊ. तुम्ही तबला, पेटी व साथीदारासह येऊन कार्यक्रम करायचा. वाचनालयाच्या सभागृहात, कार्यक्रमाच्या आयोजनाची सर्व व्यवस्था आम्ही पाहू". आगाशे सरांच्या या प्रस्तावाला मी लगेच मान्यता दिली. कारण 'कुटुंब रंगलंय काव्यात'चा तिकीट लावून असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच सादर करणार होतो.


सर्वकाही ठरल्यावर आम्ही दोघेही कामाला लागलो. थत्ते नावाच्या एक संगीत शिक्षिका माझ्या चांगल्या परिचयाच्या झाल्या होत्या. चांगल्या कविता निवडून त्या त्यांना चालही छान लावायच्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी माझे सूर जुळले होते. 'सहा ऋतू हे वर्षामधले, सजली धरणी तयांमुळे', या कवितेतली सहा कडवी त्यांनी सहा रागांत बांधली होती. वाचनालयाच्या कार्यक्रमाबद्दल ऐकून त्यांनाही आनंद झाला. तिथे हेमंत दिवटे नावाचा एक तबलावादक, या थत्तेबाईंच्या मुळेच मला तबला साथ करायला तयार झाला. त्याचे मानधन ठरले आणि थत्तेबाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या घरीच आमची तालीम सुरू झाली. आगाशे सरांनी सुध्दा गावात कार्यक्रमाचे बोर्ड लावले. तिकीटे छापून विक्रीसाठी प्रयत्नही सुरू केले.
पण पुढे वेगळेच काहीतरी घडणार होते, याची मला कल्पना नव्हती. सर्व तयारी झाल्यानंतर आगाशे सर मला म्हणाले, "बापट सर सॉरी, पण पाच रुपयाचे तिकीट असूनही कुणी ते घ्यायला तयार नाही. 'मराठी कविता पैसे देऊन काय ऐकायच्या', असेच प्रत्येकजण म्हणतोय. त्यामुळे आपला कार्यक्रम होऊ शकत नाही". आगाशे सरांच्या या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिकीट विक्री करून होणारा माझा पहिलाच कार्यक्रम रद्द होण्याच्या मार्गावर होता.


लहानपणी मी कीर्तनाला जात असे. कीर्तनाच्या शेवटी उपस्थित भाविकांसमोर आरतीचे तबक फिरवले जायचे. भाविक स्वेच्छेने त्यात पैसे टाकून आरती घ्यायचे. तबकात जे पैसे जमलेले असतील, ते कीर्तनकाराचे मानधन असायचे. ही घटना डोळ्यांसमोर ठेवून मी आगाशे सरांना म्हणालो, "कार्यक्रम जर विनामूल्य आयोजित केला तर रसिक येतील का? आपण एक बॉक्स ठेवू या आणि जमलेल्या रसिकांना कार्यक्रमाच्या मध्यांतरात व शेवटी, स्वेच्छेने काही देण्याची इच्छा असल्यास तसे आवाहन करू या. बॉक्समध्ये जे पैसे जमतील ते आपण घेऊ". माझी ही कल्पना आगाशे सरांना खूप आवडली आणि या पद्धतीने तो कार्यक्रम करायचे आम्ही निश्चित केले. कार्यक्रम विनामूल्य असल्याचे जाहीर करण्यात आले. रसिकजन सहकुटुंब एकत्र आले. कार्यक्रम विनामूल्य म्हटल्यावर रसिकांनी हॉलमध्ये प्रचंड गर्दी केली. माझ्या सादरीकरणावर माझा विश्वास होता. कवींच्या शब्दांची ताकद मला चांगलीच माहित होती. सरस्वती मातेचा आशीर्वाद आणि गुरुंची कृपा, यामुळे माझा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. रसिकांनी मुक्तकंठाने भरभरून दाद दिली. मध्यांतरात व कार्यक्रमाच्या शेवटी आगाशे सरांनी रसिकांना केलेल्या आवाहनालाही रसिकजनांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बॉक्समध्ये जमलेल्या पैशांतून, माझे मानधन घेऊन उरलेले पैसे आम्ही वाचनालयाच्या मदतीसाठी आगाशे सरांकडे सुपूर्द केले.


या कार्यक्रमामुळे, माझा 'कार्यक्रम आयोजित करायची' नवीन कल्पना मला मिळाली होती. त्यानंतर, एखाद्या छोट्या गावातल्या रसिकांपर्यंत कार्यक्रम पोहोचवणे, त्यातून थोडेफार मानधन मिळवणे व पुढच्या गावाकडे निघणे असा माझा उपक्रम सुरू झाला. यातून 'कुटुंब रंगलंय काव्यात'चे कार्यक्रम; तसेच शालेय कार्यक्रम सादर करत आणि भेटणाऱ्या नवनवीन कवींच्या कविता संकलित करत माझा हा प्रवास खऱ्या अर्थाने पुढे सुरू झाला...!

Comments
Add Comment

सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग

कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर

बिग बॉस सीझन ६ मध्ये 'या' मराठी कलाकाराची एंट्री;ज्याने अल्लू अर्जुनला दिलाय आवा

Shreyas Talpade : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन ६ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत

अभिनेत्री तेजस्विनी लोणारेनी लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर केले 'हे' खास फोटो

समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांच घर हे खूप सुंदर आहे. घरातील भडकपणा टाळून साधेपणा जपण्यात

धुरंधर पार्ट २ लवकरच होणार रिलीज; अखेर तो दिसणार की नाही?

Dhurandhar 2 Big Entry : धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने तूफान कामगिरी करत केली असून

Katrina Kaif And Vicky Kaushal : "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा किरण..." अखेर समोर आलं ज्युनिअर कौशलचं नाव

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस

Kartik Aaryan: "मिस्ट्री गर्ल करिना म्हणते – मी कार्तिकची गर्लफ्रेंड नाही; फोटो व्हायरल"नक्की काय प्रकरण ?

Kartik Aaryan: बॅालीवुडमधील आपल्या भन्नाट अभिनयामुळे ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन आणि सोनु की टिटु की स्विटी या