नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि राष्ट्रसेवा शिकवतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की संघ आणि पक्ष यांच्यातील संबंध परस्पर सन्मानावर आधारित आहेत.
बिहारमधील राजकीय समीकरणांवर बोलताना सिंह यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की एनडीए पुन्हा एकदा सत्तेवर येईल. जनतेचा कल पाहता असे वाटते की एनडीए सरकार बनवेल आणि दोन-तृतीयांश बहुमत मिळण्याचीही शक्यता असल्याचे राजनाथ म्हणाले.
बिहारमध्ये नीतीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत आणि निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहार विधानसभा निवडणुका २ टप्प्यांत होत आहेत पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. निकालांची घोषणा १४ नोव्हेंबर रोजी होईल.
राजनाथ सिंह यांनी निवडणूक रणनीतिकार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या प्रशांत किशोर आणि त्यांच्या ‘जन सुराज’ पक्षावरही प्रतिक्रिया दिली. “प्रशांत किशोर यांचा विशेष प्रभाव नाही आणि त्यांच्यावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. जनता ओळखते की कोण खरोखर सरकार बनवण्यासाठी निवडणूक लढतो आणि कोण केवळ मतविभाजनासाठी,” असे ते म्हणाले. त्यांनी असा अंदाजही व्यक्त केला की ‘जन सुराज’ पक्षाला एकही जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.
बिहार विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर भाजपला नवा अध्यक्ष मिळेल असे संकेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. तसेच पक्षांतर्गत कुठलेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले.