वॉशिंग्टन : आधुनिक मुलं डुकराच्या आकाराच्या भिशीत म्हणजेच ‘पिगी बँक’मध्ये नाणी साठवून बचत करण्याची सवय लावून घेत असतात. अमेरिकेतील ओरेगन राज्यातील पोर्टलँड शहरात राहणारे एली पियाट यांनाही लहानपणापासूनच नाणी साठवण्याची सवय होती. गेल्या १० वर्षांपासून ते त्यांच्या ‘स्टार वॉर्स’ थीमच्या पिगी बँकमध्ये सुट्टे पैसे टाकत होते. अलीकडेच जेव्हा त्यांनी ही भिशी उघडली आणि त्यातील सर्व नाणी मोजली, तेव्हा त्यांना ही लहानपणीची ‘बचत’ पाहून धक्काच बसला. ही रक्कम एकूण ५७ हजार रुपयांची होती!
एली यांनी आपली सर्व नाणी एका कॉईनस्टार मशिनमध्ये टाकली. हे एक असे मशिन आहे, जे नाण्यांना नोटा किंवा गिफ्ट कार्डमध्ये रूपांतरित करते. मशिनने मोजणीनंतर सांगितले की, त्यात ८०१ पेनी, ९२८ निकेल, १२०२ डाइम, २००२ क्वार्टर, १ हाफ-डॉलर कॉइन आणि ११ डॉलरच्या नोटा होत्या. एकूण रक्कम ६८६.६१ डॉलर्स (सुमारे ५७,००० रुपये) इतकी झाली. कॉइनस्टार मशिनने त्यांच्या सेवेसाठी ८९.१६ डॉलर्स इतकी प्रोसेसिंग फी कापून घेतली. त्यामुळे एली यांना शेवटी ५९७.४५ डॉलर्स (जवळपास ४९,००० रुपये) मिळाले. या कपातीनंतरही एली खूश होते आणि ते म्हणाले, “मला विश्वासच बसला नाही की मी इतक्या मोठ्या रकमेची बचत केली होती.” एली यांनी ही रक्कम त्यांचा आवडता छंद, विनाइल रेकॉर्डस् (जुने म्युझिक रेकॉर्डस्) खरेदी करण्यासाठी खर्च केली.
त्यांनी सांगितले, “मी काही रेकॉर्डस् विकत घेतले जे मला बऱ्याच काळापासून हवे होते. हे माझ्यासाठी एक छोटे पण संस्मरणीय बक्षीस होते.” एली यांनी त्यांच्या कॉईनस्टार पावतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी लिहिले, “१० वर्षे लागली; पण शेवटी माझी स्टार वॉर्स गुल्लक भरली.”