भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन
मुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधक आता रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना परावृत्त केले पाहिजे आणि मुंबईत उन्नती, प्रगती आणि विकास करण्यासाठी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. महापालिकेवर आपला महापौर यायला हवा, यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी अंधेरीतील एका विशेष कार्यक्रमात केले.
बहिण लाडकी, भाऊबिज देवाभाऊंची असे मुंबईत सहा जिल्ह्यामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली कायक्रम आयोजित करण्यात येत असून त्यातील पहिला विशेष कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील शेरे पंजाब येथील महापालिका मैदानात पार पडला. उत्तर पश्चिम महिला मोर्चाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, प्रतिक कर्पे, महायुतीचे आमदार मुरजी पटेल, उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती सातम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येन उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात बोलतांना अमित साटम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिण आपली याचा कार्यक्रम याच मैदानावर पार पडला होता आणि सर्वांचे लाडके देवाभाऊंना सर्वाधिक आशिर्वाद दिला होता. त्याच मैदानावर आज बहिण लाडकी भाऊबिज देवाभाऊंची हा कार्यक्रम पार पडला जात आहे. त्यामुळे देवाभाऊंच्या वतीने मी आपले आशिर्वाद स्वीकारण्यासाठी आलो आहे,असे सांगितले. त्यामुळे भ्रष्टाचार विरहित सत्ता मुंबईत आणण्याची गरज आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला सुरक्षित शहर बनवण्याचा संकल्प केला आहे. मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर शहरात सीसी टिव्ही कॅमेरा लावण्याची केवळ घोषणा केली. पण आधीच्या सरकारला हे काम करता आलेले नाही, पण सन २०१४मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुंबईत २०१६मध्ये सहा हजार सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामुळे महिला आजही रात्री अपरात्री सुरक्षितपणे अंगावर दागिने घालून फिरत आहेत,असे साटम यांनी सांगत फडणवीस यांच्यामुळे मुंबई शहराला गतीमान दिवस आले आहेत. आज अनेक प्रकल्प सुरु असून मुंबईच्या विकासाची दूरदृष्टी असणारा हे मुख्यमंत्री आहेत.नुकत्याच एका सर्वेमध्ये मुंबई शहर हे प्रथा, परंपरा आणि सुरक्षितता यामध्ये सर्वात सुरक्षित शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर दर्शवले गेले आहे.
याप्रसंगी भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चाचा अध्यक्षा प्रीती सातम यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत आज आपल्या सर्व महिलांसाठी देवाभाऊंनी भाऊबीजेचा विशेष कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. याप्रसंगी सातम यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चावर आधारीत ध्वनी चित्रणाच्या गाण्याचे अनावरण अमित साटम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शर्मा आणि मुरजी पटेल यांचीही भाषणे झाली. या जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रभागांमधील महिलांना ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली. सुरुवातीला विभागातील विविध वर्गातील महिलांच्यावतीने साटम यांची ओवाळणी करण्यात आली.