मुंबई (खास प्रतिनिधी): वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त मुंबई भाजप तर्फे मुंबईमध्ये शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त सहा ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. यातील ईशान्य मुंबईतील कार्यक्रम मानखुर्द पी एम जी पी कॉलनीत होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना दिले आहे.
भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी आझमी यांना पत्र पाठवून या कार्यक्रमाला निमंत्रित राहण्याचे कळवले आहे. साटम यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, शुक्रवारी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रगीत "वंदे मातरम्" या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वंदे मातरम् गीताच्या कथनाचा एक विशेष कार्यक्रम आपल्याच घराजवळच सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत देशभक्ती, एकता आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. आपण सुद्धा या गीताचे कथन व गायन आमच्यासोबत करावे, या करिता सदर कार्यक्रमाला मी आपणास निमंत्रित करत आहे. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून वंदे मातरम् कथनामध्ये सहभागी व्हाल, अशी अपेक्षा आहे,असे म्हटले आहे.
अबू आझमी यांनी वंदे मातरम् गीत शाळांमध्ये म्हणण्यास जाहीर विरोध केला आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना निमंत्रित केल्याचे बोलले जात आहे .