पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार
मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील घरांच्या चाव्या मिळाल्या आहेत. त्यानंतर आता आणखी ८४६ जणांना पुढील आठवड्यात घरांच्या चाव्या मिळणार आहेत. दादर येथील नायगाव बीडीडी चाळीतील १६० चौरस फुटांच्या घरांत राहणाऱ्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गंत असलेल्या पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार झाल्या आहेत.
वरळी, नायगाव आणि ना.म.जोशी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. येथील इमारतींना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहेत. नायगाव येथील ४२ चाळींचा पुनर्विकास केला जातोय. यातील ३ हजार ३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० इमारतीत केले जाणार आहे. येथील दोन टप्प्यात काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ इमारती बांधल्या जाणार आहेत.
ना.म.जोशी मार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरमध्ये ३४२ रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम सुरू आहे. सातपैकी दोन इमारतींचे काम झाले असून ३४२ रहिवाशांना येत्या डिसेंबरपर्यंत ताबा देण्यात येणार आहे. तर, पाच इमारतीतील रहिवाशांना मार्च २०२६ नंतर ताबा मिळणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासप्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील ५५६ रहिवाशांना चावी वाटप करण्यात आले आहे. वरळी पुनर्विकास प्रकल्पात वरळी येथे ९,६८९ पुनर्वसन सदनिका (९,३९४ निवासी + २९५ अनिवासी), नायगाव येथे ३,३४४ सदनिका आणि ना.म.जोशी मार्ग येथे २,५६० सदनिकांचे बांधकाम हाती घेण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यातील ५५६ घरांच्या चाव्या १४ ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आल्या. या सदनिका ५०० चौरस फुटांच्या असून, दोन ४० मजली इमारतींमध्ये बांधल्या गेल्या आहेत.
बीडीडी (बॉम्बे डेव्हलपमेंट डायरेक्टोरेट) चाळ पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील वरळी, नायगाव, आणि ना. म. जोशी मार्ग येथील जुन्या चाळींचा पुनर्विकास करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आणि म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकासप्राधिकरण) यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत १६० चौरस फुटांच्या जुन्या खोल्यांऐवजी रहिवाशांना ५०० चौरस फुटांच्या आधुनिक २ बीएचके सदनिका मोफत दिल्या जात आहेत.