मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी
जोधपूर : जलद गतीने धावणारी वंदे भारत देशाच्या विविध भागांत प्रवासी सेवा देत असली तरी वंदे भारतच्या मेंटेनन्सबाबत रेल्वेकडून ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. वंदे भारतच्या देखभालीसाठी, डागडुजीसाठी ठरावीक ठिकाणी कार्यवाही होत असली तरी ही समस्या आता संपुष्टात येणार आहे. वंदे भारतच्या नव्या गाड्यांच्या देखभालीसाठी देशभरातील दिल्लीत दोन, मुंबई व बंगळूरु येथे प्रत्येकी एका अशा पाच ठिकाणी डेपोची उभारणी केली जात असून, त्यातील पहिला डेपो जोधपूर येथे आकार घेत आहे. लातूर येथील कारखान्यात २४ डब्यांची शयनयान श्रेणीतील ‘वंदे भारत’ गाड्यांची निर्मिती केली जात आहे.
दिवसभरात नऊ ‘वंदे भारत’ शयनयान श्रेणीतील गाड्यांची देखभाल या ठिकाणी केली जाणार आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत या डेपोच्या पहिल्या टप्प्याची उभारणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. वंदे भारत ही आकाराने लांब आणि अतिवेगवान प्रकारात मोडणारी रेल्वे आहे. यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभी करणे आवश्यक होते. अशी रेल्वे बनवण्यासोबतच तिच्या दुरुस्तीची यंत्रणा भारतीय रेल्वेने उभी केली ही गौरवास्पद बाब आहे.
- मेजर अमित स्वामी, वरिष्ठ यांत्रिकी अभियंता, जोधपूर रेल्वे विभाग