कथा : रमेश तांबे
“अरे विनू फटाके फोडताना जरा जपून” आईने घरातूनच आवाज दिला. पण उत्साही विनूपर्यंत तो आवाज पोहोचलाच नाही. कारण तो त्याच्या मित्रांसह फटाके वाजवण्यात दंग झाला होता. हातात विविध प्रकारचे फटाके असलेली पिशवी होती. त्यात लवंगी माळा, भुईचक्रे, नागाच्या गोळ्या, फुलबाजे होते. नवे कपडे घालून मौजमस्ती करीत, कधी मित्रांसोबत तर कधी एकटाच दिवाळीचा आनंद लुटत होता. दिवाळी हा प्रकाशाचा सण हे त्याचे बिरूद तो सार्थ करीत होता. कारण सर्वत्र विजेच्या दिव्यांची रोषणाई केली होती. रंगीबेरंगी दिव्यांनी सारा परिसर उजळून निघाला होता. विनूच्या घराला छान कंदील लावला होता. त्याच्या झिरमिळ्या घरात येता-जाता डोक्याला स्पर्श करीत होत्या. घरात लाडू, करंज्या, चकल्या, अनारसे अशा विविध पदार्थांचा खमंग सुवास पसरला होता.
तेवढ्यात विनयचे बाबा म्हणाले, “विनू चल, ठेव ते फटाके. आपल्याला जरा बाहेर जायचे आहे.” बाबांनी सांगताच विनू थोडा हिरमुसलाच. पण बाबांची आज्ञा म्हणून त्याने फटाके वाजवणे बंद केले अन् हात-पाय धुवून तयार झाला. तिकडे आई, ताईदेखील तयार झाल्या होत्या. त्यांच्या हातात फराळांनी भरलेले डबे होते. मग सारे जण गाडीत बसले आणि बाबांनी गाडी बाहेर काढली. “आई हे काय आहे? आज दिवाळीचा पहिला दिवस मजा करण्याचा, मित्रांबरोबर मौजमस्ती करण्याचा, भरपूर फटाके वाजवण्याचा! आज कुठे चाललोय आपण सकाळी सकाळी? १० वाजून गेले होते. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर एका जुनाट इमारती जवळ बाबांनी गाडी उभी केली.
दोन मजली रंगरंगोटी न केलेली इमारत. त्यावर “गंगाबाई पाटील अनाथाश्रम” हा फलक लावला होता. पण विनूचे त्याकडे लक्ष गेलेच नाही. ठरल्याप्रमाणे बरोबर ११ वाजता ते इमारतीमध्ये शिरले. बाबांना पाहताच आश्रमाचे प्रमुख स्वागताला धावले. विनू मोठ्या आश्चर्याने बघत होता. आपण कुठे आलो याचा त्याला अंदाज नव्हता. मग ते एका प्रशस्त हॉलमध्ये शिरले. तर तिथे सर्व मुले-मुली एका रांगेत बसली होती. आई आज आपण शाळेत का आलोय? त्यांना दिवाळीची सुट्टी नाही का? घरी बसून मजेत दिवाळी साजरी करायची सोडून हे इथे काय करतात? विनयची बडबड ऐकून बाबा म्हणाले, “विनू दोन मिनिटे थांब. कळेल तुला सगळे.” मग बाबा, आई, ताई आणि विनय समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले. आता तिथले प्रमुख माईक वरून सांगू लागले.
ते म्हणाले, “मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की हा आहे आमचा अनाथ मुलांचा आश्रम. म्हणजे इथल्या मुलांना कोणीच नाही. ना आई-बाबा, कुणी दूरचे नातेवाईक. या मुलांचा आम्ही शोध घेतला. बिचारे कुठे रस्त्यावर झोपलेले, कुठे भीक मागताना, कधी बसस्थानकावर, तर कधी रेल्वेच्या फलटावर फिरताना! त्यांना शोधून आणले. इथे आम्ही त्यांच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय करतो. आता आमच्याकडे शंभर-सव्वाशे मुलं-मुली आहेत. हा आश्रम चालवण्यासाठी आम्हाला सरकारची मदत मिळते. पण ती तेवढी पुरेशी नसते. मग तुमच्यासारखी दानशूर लोकं मुलांना मदत करतात. आता दिवाळी सुरू आहे पण आम्ही नाही ती साजरी करू शकत. पण पानसरे कुटुंबाला आज या मुलांसोबत दिवाळी साजरी करायची आहे.” विनय ऐकत होता. ऐकता ऐकता समोर बसलेल्या मुलांकडे एकटक पाहत होता.
आता विनूच्या मनात विचारचक्र सुरू झाले. या मुलांना आई-बाबाच नाहीत, मग कशी राहतात ही लहान मुले! मी माझ्या आई-बाबा-ताईसह राहतो. छान घरात राहतो, शाळेत जातो, स्वतःच्या गाडीने फिरतो. विनूचे मन हळवे बनले. आश्रमाच्या प्रमुखांचे बोलणे संपल्यावर चक्क विनयच उठला आणि म्हणाला, “होय आज मी या मुलांसोबत दिवाळी साजरी करणार. बाबा मी माझे फटाकेसुद्धा सोबत आणले आहेत.” विनयचे बोलणे ऐकून सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. मग सर्व मुलांना फराळ वाटला. एक एक लाडू प्रत्येकाच्या ताटात वाढताना एक प्रकारचा अनामिक आनंद, समाधान विनूच्या चेहऱ्यावर दिसत होते. आपण लोकांना मदत केली पाहिजे हा विचार विनूच्या मनात पक्का झाला होता. आश्रमातून निघताना तो सगळ्या मुलांना म्हणाला, “मी लवकरच परत येईन. माझ्या मित्र मंडळींना घेऊन, तुमच्यासोबत धमाल करायला.”
घरी जाताना गाडीत कुणीच काही बोलत नव्हते. पण आई, बाबांना मात्र खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असे वाटत होते. कारण त्यांचा विनू आज मोठा झाला होता. एक संवेदनशील मनाचा माणूस बनला होता.