मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा मोठी निराशा सहन करावी लागली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा डळमळीत झाली. सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि अखेर संपूर्ण संघ १८.४ षटकांत फक्त १२५ धावांवर गडगडला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. जोश हेझलवूड आणि नॅथन एलिस यांनी भारताच्या महत्वाच्या विकेट घेतल्या. हेझलवूडने शुभमन गिल (५), सूर्यकुमार यादव (१) आणि तिलक वर्मा (०) या महत्वाच्या विकेट घेतल्या. तर नॅथन एलिसनं संजू सॅमसनला (२) माघारी पाठवलं. अक्षर पटेल (७) रनआऊट झाला आणि अवघ्या ४९ धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत परतला.
या बिकट परिस्थितीत अभिषेक शर्मानं एकहाती खिंड लढवली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत ३७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा ठोकल्या. त्याच्या साथीला हर्षित राणाने (३५ धावा) उत्तम साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ४७ चेंडूंमध्ये ५६ धावांची उल्लेखनीय भागीदारी करत भारताला काहीसा आधार दिला.
अभिषेकने या खेळीत अनेक विक्रम मोडले, त्याने २५ इनिंग्जनंतर विराट कोहलीच्या (९०६) सर्वाधिक धावांच्या विक्रमाला मागे टाकले आणि पहिल्या २५ डावांत ८ वेळा ५०+ धावांची खेळी करून विराटच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
मात्र, हर्षित बाद झाल्यानंतर पुन्हा भारताचा डाव फसला. शिवम दुबे (४) आणि कुलदीप यादव (०) काहीच करू शकले नाहीत. शेवटी अभिषेक शर्माची विकेट गेल्यानंतर जसप्रीत बुमरहा रनआऊट झाला आणि भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला.
भारतीय फलंदाजीतील अस्थिरता आणि सततची विकेट गळती ही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अभिषेक शर्माच्या झळाळत्या अर्धशतकाने थोडी आशा निर्माण केली असली तरी बाकीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला या सामन्यात स्पर्धात्मक धावसंख्या उभारता आली नाही.