मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना अनुकूल असणारी झाडे लावण्यात यावीत, असे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
मंत्री नाईक यांनी मंत्रालयात वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
वसई विरार महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये पिकनिक पार्कचे आरक्षण आहे. या सात एकर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात यावे. यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कार्यवाही तातडीने करावी. पक्षांना अनुकूल असणारी झाडे शासकीय नर्सरीत नसतील तर खासगी नर्सरीतून अशी झाडे घेण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सुर्यवंशी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आदी उपस्थित होते.
आयुष्मान आरोग्य मंदिरांचे अनावरण
वसई विरार महापालिकेच्या वतीने ११ आयुष्मान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. या आरोग्य मंदिरांचे ऑनलाईन अनावर पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
पालघर महापालिका हद्दीतील ११७ शाळा व तीन आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.