मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कबुतरखान्यांबाबत, नागरिकांच्या हरकती तथा सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, कार्यवाही करुन, मुंबईत जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हायर),के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम, टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली - मुलुंड जकात नाका, ऐरोली - मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व), आणि आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तरीही, विद्यमान कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदच राहतील, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.
या चारही ठिकाणी कबुतरांना 'नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी असेल. त्यानुसार, फक्त सकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीतच कबुतरांना दाणे पुरवता येतील. अन्य कोणत्याही वेळेत दाणे पुरवता येणार नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या चारही जागांवर कबुतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आली तरच ही परवानगी देण्यात येईल. कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होवू नये, कबुतरखान्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करणे, या सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. त्याअनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे. कबुतरखान्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त हे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) असतील. या कबुतरखान्यांच्या परिसरात आरोग्याविषयी जनजागृतीकरिता फलकही लावण्यात येतील.
कबुतरखान्यांबाबत एकूण ९ हजार ७७९ सूचना,हरकती, तक्रारी
दरम्यान, कबुतरखान्यांबाबत नागरिकांकडून महानगरपालिकेकडे एकूण ९ हजार ७७९ सूचना व हरकती, तक्रारी आदी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाना बंद करणे, सुरु ठेवणे, स्वच्छता राखणे, नियंत्रित पद्धतीने दाणे पुरवणे अशा सर्व पैलुंचा समावेश आहे. कबुतरखान्यांबाबत तज्ज्ञ समितीचा अहवाल व माननीय न्यायालयाचे आदेश येईपर्यंत, अंतरिम कार्यवाही म्हणून महानगरपालिकेने या नवीन चार जागांना परवानगी दिली आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
मुंबईत या चार ठिकाणी सुरू होणार नवीन कबुतीरखाने
दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हायर),
के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम,
टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली - मुलुंड जकात नाका, ऐरोली - मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व),
आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन