मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या पितापुत्राने 'क्राईम पेट्रोल' पाहून कट रचून मालकाची २७ लाख रुपयांची रोकड लुटली. मालकाला संशय येऊ नये म्हणून पित्याने डोळ्यात तिखट टाकून घेतले. स्वतः वर कटरने वार केले. स्वतःला जखमी करून, लुटमारीचा बनाव केला. या प्रकरणात गन्हे शाखेने शिताफीने तपास करून बनाव करणाऱ्या पितापुत्राला ताब्यात घेतले. पिता गणेश ओंकारराव शिंदे ( वय ४८ ) आणि मुलगा अमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. मालक दिनेश घनश्याम साबू ( वय ४५ ) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीआधारे कारवाई केली.
पोलिसांनी इंगा दाखवतात पितापुत्राने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालकाने गणेश शिंदेला २७ ऑक्टोबर रोजी २७ लाख रुपये कारमध्ये ठेवण्यासाठी दिले. गणेश शिंदे हा पैसे घेऊन कारमध्ये ठेवत असताना लुटारुंनी लुबाडल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. या प्रकरणी तपास केल्यानंतर गणेश शिंदे यांनी बनाव रचल्याचे उघड झाले. त्यांनी दोन अज्ञातांनी पिशवी खेचल्याची आणि डोळ्यात तिखट टाकल्याची कथा सांगितली होती. ही कथा निव्वळ बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे यांनी सखोल तपास केला.
असा आला संशय
पोलिसांनी तपास सुरू करताना परिसरातले सीसीटीव्ही फूटेज तपासले. जखमी कारचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते म्हणून पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या विविध नागरिकांचे जबाब नोंदविले. तसेच जखमी गणेश शिंदे यांचाही जबाब नोंदवला. नागरिकांचे जबाब आणि जखमी गणेश शिंदे यांचं जबाब यात पोलिसांना खूप फरक जाणवला. तसेच त्या चोरीचे पुरावेही गणेशाकडे नसल्याचे पोलिसांनाच लक्षात येताच त्यांनी गणेशची चौकशी सुरू ठेवली. अखेर गणेशने कबुली दिली की त्याचा मुलगा अमोल याने बनाव रचला होता.
गणेश शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी घर बांधले, त्यांची आई आजारी आहे. घराचं कर्ज शिवाय आईच्या औषधपाण्यासाठी घेतेलेले कर्ज याची परतफेड करणे शक्य नसल्याने क्राईम पेट्रोल पाहून हा कट रचल्याचे कबुली आरोपींनी दिली. अखेर गणेश शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल या दोघांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक गजाजन कल्याणकरयांच्यासह उपनिरीक्षक अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर, सहायक फौजदार दिलीप मोदी, सुनिल बडगुजर, हवालदार राजेंद्र साळुंके, संजय गावंडे, अमोल शिंदे, सिद्धार्थ थोरात, तात्याराव शिनगारे, अंमलदार विक्रम खंडागळे, मनोहर गिते, राहुल बंगाळे, प्रमोद सुरसे, विजय घुगे, श्याम आढे, गणेश सागरे, दादासाहेब झारगड, सोमनाथ दुकले, अंमलदार संजीवनी शिंदे यांनी ही कारवाई केली.