मुंबई : पवई परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. ‘शूटिंग ऑडिशन’च्या नावाखाली सुरू असलेल्या उपक्रमादरम्यान आर ए स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १७ मुला-मुलींसह एका ज्येष्ठ आणि एक सामान्य नागरिकाला ओलीस ठेवले होते. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत ओलीस ठेवलेल्या सर्वांची सुखरूप सुटका केली. यावेळी झालेल्या चकमकीत अर्थात एन्काउंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या आरोपी रोहित आर्यचा नंतर मृत्यू झाला.
पवई परिसरातील एका स्टुडिओमध्ये एका वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी सुमारे १०० पेक्षा जास्त मुलं आली होती. आरोपी रोहित आर्यने यापैकी बहुतांश मुलांना घरी पाठवून फक्त १७ मुले आणि २ नागरिकांना ओलीस ठेवले. काही वेळातच त्याने स्वतःचा व्हिडीओ प्रसारित करत आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आणि प्रशासनाशी संवादाची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती बिघडत गेल्याने अखेर गोळीबार करण्यात आला. एअरगन सोबत ठेवून अनेकांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने पोलिसांवर गोळी झाडली. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी झाडलेली गोळी आर्यच्या छातीत लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी असून, त्याने यापूर्वी शासनाकडे थकबाकीबाबत तक्रार केली होती. एका शाळेच्या दुरुस्तीचे पैसे न दिल्याचा आरोप त्याने केला होता. याच प्रकरणात तो काही महिन्यांपासून उपोषण करत होता.
आरोपीने एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, “मला या मुलांना काहीच करायचं नाही. मात्र मला काही लोकांशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत. मला कोणी रोखण्याचा, इथे येण्याचा प्रयत्न केला तर या मुलांबरोबर काही वाईट घडलं तर त्यास मी जबाबदार नसेन.”
दरम्यान, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे १९ निष्पाप जीव सुखरूप सुटले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.