पुणे : लग्नासाठी विवाह मंडळामध्ये नोंदणी केलेल्या मुला-मुलींच्या फोटोंचे वेगवेगळे प्रोफाइल बनवून त्यातील नाव आणि इतर तपशील बदलून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाह मंडळाच्या संगनमतातून हा प्रकार घडत होता. या प्रकरणात विवाह मंडळातील तिघांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशांनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
वधूवर सूचक मंडळांचा नेमका प्रकार तरी काय ?
राजेश बेल्हेकर हे त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुलगी शोधत होते. त्यांनी एका वृत्तपत्रात ९ मार्च २०२५ रोजी ‘वर पाहिजे’ सदरातील शुभऋषी विवाह मंडळाची जाहिरात बघितली. जाहिरात बघून त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क केला. सुरुवातीला मंडळाकडून सासवड येथील एका वधूची माहिती फोटोसह पाठवण्यात आली. बेल्हेकर यांनी आपल्या मुलाचा फोटो आणि माहिती पाठवल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मुलीकडील पसंती असल्याचा मेसेज आला. यानंतर मंडळाची वेबसाईट आणि संपर्क साधण्यासाठी ३ हजार ५०० रुपये वार्षिक वर्गणी ऑनलाईन भरण्यास सांगण्यात आले.
बेल्हेकर यांनी काही दिवस विचार करून हा विषय बाजूला ठेवला. मात्र, २ एप्रिल २०२५ रोजी त्यांना याच मंडळाची दुसरी जाहिरात दिसली आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी हा नंबर विद्या देशपांडे यांचा असल्याचे समजले. विद्या देशपांडे यांनी सुरुवातीला दौंड येथील एका वधूची माहिती पाठवून बेल्हेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, ३ एप्रिल रोजी त्यांनी कात्रज येथील दोन वधूंची माहिती पाठवली आणि वार्षिक वर्गणीची रक्कम ३ हजार भरण्यास सांगितली.
पैसे भरल्यानंतर विद्या देशपांडे यांनी वधूंचे पत्ते आणि संपर्क क्रमांक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. खूप काळ मागे लागल्यानंतर विद्या देशपांडे यांनी दौंड आणि कात्रज येथील वधूंच्या आईचे पत्ते आणि फोन नंबर दिले. मात्र ते खोटे असल्याचे लक्षात आले. याव्यतिरिक्त, मंडळाकडून आलेल्या मेसेजमध्ये एका वधूकडून नकार आल्याचे खोटे कळवण्यात आले. तर पूर्वी त्याच वधूकडून पसंती दर्शवण्यात आली होती.
यानंतर बेल्हेकर यांनी इतर दोन विवाह मंडळांशी संपर्क साधला. त्यावेळी लक्षात आले की, त्यांना पूर्वी ज्या मुलींच्या प्रोफाइल पाठवण्यात आल्या होत्या त्यांचे फोटो आणि नाव यांच्यात तफावत आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांनी खोलवर चौकशी केली. या चौकशीमुळेच त्यांना विवाह मंडळाने फसवणूक केल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस फसवणूक प्रकरणात पुढील तपास करत आहेत.