मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो मध्ये महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे देखील सहभागी आहे. सुरुवातीच्या काळात प्रणीतला खेळाची गती समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. पण आता प्रणितने आपलं स्थान पक्कं केलं आहे. कधी हसवणारा,कधी भिडणारा प्रणित आता घरातल्या इतर सदस्यांवर आपला प्रभाव दाखवत आहे. त्याच्या खेळातील बदल आणि रणनीती पाहून प्रेक्षकही उत्सुकतेत आहेत. अशातच या आठवड्यातील घडामोडीनंतर प्रणित ‘बिग बॉस १९’च्या घराचा नवा कॅप्टन’ बनला आहे.
या आठवड्यात घरात झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये विभागलं होतं. या जोड्या कुनिका-नीलम, तान्या-मृदुल, प्रणित-शहबाज, गौरव-मालती आणि अमल-फरहाना अशा होत्या. मात्र, अभिषेक आणि अशनूर यांनी नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना या आठवड्यातील स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. टास्कमध्ये घरातील वस्तू गोळा करण्याचं काम देण्यात आलं होतं, आणि ज्या जोडीने सर्वाधिक वस्तू जमा केल्या ती कॅप्टन्सीसाठी पात्र ठरणार होती. टास्कमध्ये टाय झाल्यानंतर घरातील सदस्यांच्या मतदानावरून प्रणित आणि शहबाज या जोडीला कॅप्टन्सी टास्कसाठी निवडण्यात आलं.
यानंतर दोघांमध्ये आणखी एक निर्णायक फेरी झाली, ज्यात अशनूर, अभिषेक, गौरव आणि मालती यांच्या पाठिंब्याने प्रणितने विजय मिळवला आणि तो घराचा नवा कॅप्टन ठरला.
“बिग बॉस तक”च्या माहितीनुसार, या कॅप्टन्सी टास्कला ‘मिस्टिरियस सायंटिस्ट लॅब’ असं नाव देण्यात आलं होतं. प्रत्येक फेरीत ‘शास्त्रज्ञ’ काही विशिष्ट वस्तू मागत होता आणि घरातील जोड्या त्या वस्तू पुरवत होत्या. ज्यांच्या हाती सर्वाधिक डिलिव्हरी गेल्या, ती जोडी त्या फेरीची विजेती ठरत होती.
टास्कमधील जोड्या आणि विजेते
पहिल्या फेरीत टेडी बेअर्स गोळा करण्याचं काम होतं — विजेते शहबाज आणि प्रणित.
दुसऱ्या फेरीत लाकडी हत्ती गोळा करायचे होते — अमल आणि फरहाना विजेते.
तिसऱ्या फेरीत हेल्मेट गोळा करायचे होते — नीलम आणि कुनिका विजेत्या.
चौथ्या फेरीत टॉवेल गोळा करायचे होते — गौरव आणि मालती विजेते.
पाचव्या फेरीत लाकडी काठ्या गोळा करायच्या होत्या — पुन्हा अमल आणि फरहाना विजेते.
सहाव्या फेरीत चमचे गोळा करायचे होते — मृदुल आणि तान्या विजेत्या.
सातव्या फेरीत उशा गोळा करायच्या होत्या — गौरव आणि मालती विजेते.
फेऱ्या संपल्यानंतर सामना बरोबरीत राहिल्याने सर्व सदस्यांना व्होटिंगसाठी बोलावण्यात आलं. व्होटिंगचा निकाल शहबाज-प्रणित जोडीला ५ मते, तर गौरव-मालती जोडीला ३ मते असा लागला. त्यामुळे प्रणित-शहबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
अंतिम कॅप्टन्सी टास्कचं नाव होतं ‘गनशॉट’. या फेरीत स्लाईडवरून तीन बॉल पडत होते, पण त्यापैकी फक्त एका बॉलवर नंबर लिहिलेला होता. जो कोणी तो नंबर असलेला बॉल पकडेल, त्याला तीन पर्याय दिले जात होते तो बॉल प्रणितला द्यायचा, शहबाजला द्यायचा किंवा रेशन बोर्डवर ठेवायचा. शेवटी बोर्डवर सर्वाधिक एकूण नंबर असणारा स्पर्धक कॅप्टन ठरवला जाणार होता.
अभिषेक, अशनूर, गौरव आणि मालती यांच्या मदतीने प्रणितने शेवटी विजय मिळवला आणि तो ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन बनला.
मराठमोळा प्रणित कॅप्टन झाल्याने आता प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये आणखी धमाल आणि स्पर्धात्मक वातावरण पाहायला मिळणार आहे.