मुंबई : मुंबईतल्या पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शूटिंगच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑडिशनच्या ठिकाणी एका व्यक्तीने अचानक अनेक मुलांना ओलीस ठेवत व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ मुला-मुलींना त्याने बंदी बनवले असून पोलिस आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सदर आरोपीचं नाव रोहित आर्य असं असून त्याने आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे की, “मी दहशतवादी नाही. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मुलांना ओलीस ठेवलं आहे, कारण मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे.”
रोहित आर्यने पुढे म्हटलं की, “मी पैशांची मागणी केलेली नाही. माझं उपोषण १ मेपासून सुरू आहे. अनेकांकडे गेलो, अनेक वेळा प्रयत्न केले, पण माझ्या प्रश्नांकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज मी तीव्र उपोषण सुरू केलं आहे. आता मी पाणी सुद्धा घेणार नाही. सरकार आणि संबंधित लोकांनी या प्रश्नाचं गांभीर्य ओळखावं, नाहीतर पुढचं पाऊल काय असेल हे सांगू शकत नाही.” त्याने पुढे सांगितले की, “हा प्रश्न फक्त माझा नाही, अनेक लोकांचा आहे. मला समाधानकारक उत्तर आणि संवाद हवा आहे.” सध्या पोलिस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडोनी परिसराला वेढा दिला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अखेरच्या वृत्तानुसार सुरक्षा पथकाने गोळीबार केला. या गोळीबारात मुलांना डांबून ठेवणारा जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.