तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...


आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव


मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत असून आता जेव्हा कोणत्याही अनामिक नंबरवरून कॉल येईल तेव्हा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर त्या व्यक्तीचा नंबरसह त्या व्यक्तीचे नाव ही दिसेल. विशेष म्हणजे हे सर्व कोणत्याही ॲपशिवाय घडणार आहे. दूरसंचार नियामक ट्राय आणि दूरसंचार विभाग (डीओटी) यांनी फसवे कॉल आणि सायबर गुन्हे आळा घालण्यासाठी हे नवे पाऊल उचलले आहे.


कॉलिंग नेम प्रेझेंटेशन’ (सीएनएपी) या नव्या सेवेमुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाईल कनेक्शन घेताना त्याने दिलेल्या आयडीप्रमाणेच दिसणार आहे. ही सेवा सर्व वापरकर्त्यांसाठी डीफॉल्टनुसार सुरू राहील, मात्र ज्यांना ती नको असेल त्यांनी ती बंद करण्याची विनंती करू शकतील. याआधी ट्रायने फेब्रुवारी 2024 मध्ये या सेवेबाबत डीओटीला शिफारस केली होती की सेवा फक्त ग्राहकाच्या विनंतीनंतरच सुरू व्हावी. परंतु डीओटीने ती डिफॉल्ट सेवा करण्याचा सल्ला दिला आणि आता ट्रायने त्यास मान्यता दिल्याने दोन्ही विभागांमध्ये यावर एकमत झाले आहे.


या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे फसवे कॉल्स, डिजिटल घोटाळे आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण ठेवणे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांमुळे अनेक नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या नव्या सुविधेमुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीची खरी ओळख दिसल्याने फसवणूक करणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि ग्राहकांना सावध राहता येईल.


या सुविधेत काही अपवादही ठेवण्यात आले आहेत. कॉलिंग लाईन आयडेंटिफिकेशन रिस्ट्रिक्शन (सीएलआयआर) असलेल्या वापरकर्त्यांची नावे स्क्रीनवर दिसणार नाहीत. ही सवलत साधारणतः केंद्रीय गुप्तचर संस्थांचे अधिकारी, व्हीआयपी व्यक्ती किंवा सुरक्षा कारणास्तव गुप्तता राखणाऱ्या ग्राहकांना दिली जाते. तथापि, फोन कंपन्यांना सीएलआयआर मिळालेल्या सामान्य ग्राहकांची काटेकोर तपासणी करावी लागणार असून आवश्यकतेनुसार कायदा अंमलबजावणी संस्थांना त्या माहितीचा प्रवेश मिळेल. मात्र बल्क कनेक्शन, कॉल सेंटर किंवा टेलिमार्केटरना या सुविधेचा लाभ मिळणार नाही.


फसवे आणि स्पॅम कॉल्स हे आजच्या काळातील सर्वाधिक त्रासदायक प्रश्न झाले आहेत. कर्ज देण्याचे, लॉटरी जिंकल्याचे, गुंतवणुकीचे किंवा विविध सेवांचे प्रलोभन देणारे कॉल्स आणि मेसेजेस हे अनेकदा लोकांच्या संमतीशिवाय पाठवले जातात. अशा कॉल्सना उत्तर देणाऱ्या लोकांना वारंवार टार्गेट केले जाते. त्यामुळे शक्य तितके असे कॉल्स दुर्लक्षित करणे हेच योग्य ठरेल.


अनेकांना नेहमी प्रश्न पडतो की अशा कंपन्यांना आपला मोबाईल नंबर कुठून मिळतो. प्रत्यक्षात वापरकर्ते स्वतःच आपली माहिती विविध माध्यमांतून देतात सोशल मीडिया अकाउंट तयार करताना, शॉपिंग वेबसाइटवर खरेदी करताना किंवा कोणतेही ॲप डाउनलोड करताना आपण मोबाईल नंबर देतो आणि त्याच वेळी त्या ॲपला फोनमधील डेटाचा प्रवेश देतो. याशिवाय काही कंपन्या वापरकर्त्यांची माहिती तृतीय पक्षांना विकतात आणि तिथूनच हे नंबर जाहिरात कंपन्यांकडे पोहोचतात.


जर तुम्हाला स्पॅम कॉल आला तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनोळखी कॉलवर कोणीही वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक, ओटीपी किंवा ओळखपत्र क्रमांक सांगू नका. कॉल करणारा स्वतःला सरकारी अधिकारी किंवा बँकेचा प्रतिनिधी सांगत असेल तरी अधिकृत वेबसाइटवरील क्रमांकावरून पडताळणी करा. कोणत्याही कॉलवर "हो" किंवा "नाही" अशी उत्तरं देऊ नका, कारण त्यांचा गैरवापर होऊ शकतो. जर एखादा कॉल संशयास्पद वाटत असेल तर तो ताबडतोब डिस्कनेक्ट करा आणि रिपोर्ट करा.


सरकार व ट्रायच्या या नव्या निर्णयामुळे भारतातील दूरसंचार प्रणाली अधिक सुरक्षित होण्याची शक्यता आहे. नागरिकांना आता कॉलच्या पहिल्याच क्षणी कोण कॉल करत आहे हे स्पष्ट दिसणार असल्याने, फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होईल आणि ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत बनेल.


Comments
Add Comment

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा

मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार