ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार ठाण्यातील कापूरबावडी (KapurBawadi) पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. या क्रूर हल्ल्यात मुलगी ८० टक्क्यांहून अधिक भाजली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कापूरबावडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत १७ वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासह कापूरबावडी परिसरात वास्तव्यास आहे. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात राहत होती, त्यावेळी तिची ओळख आरोपी मुलासोबत झाली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीज सणानिमित्त चेंबूर येथील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथे आरोपी मुलाने तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केली. मुलीच्या नातेवाईकांना ही माहिती मिळताच, ते मदतीसाठी धावले. नातेवाईकांनी आरोपी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यावेळी संतप्त होऊन मुलीला "जीवंत सोडणार नाही" अशी गंभीर धमकी दिली होती. या प्रकारानंतर पीडित मुलगी खूप घाबरली होती. या धमकीनंतर काही दिवसांतच आरोपी मुलाने मुलीला भेटायला बोलावून तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरा गावात ...
'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी मुलगी ठाण्यातील तिच्या घरामध्ये एकटी असताना अचानक घरातून धूर येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ ही माहिती मुलीच्या आईला दिली. मुलीचे कुटुंबीय घरात दाखल झाले असता, त्यांना आरोपी मित्र घरात दिसला. तर, पीडित मुलगी भाजलेल्या अवस्थेत वेदनेने ओरडत होती. कुटुंबीयांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले. तिचा ८० टक्के भाग भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी मुलाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, तो तेथून पळून गेला.
मुलाला पोलिसाकडून अटक
अखेरीस, मुलीच्या आईने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०९ (गुन्हा करण्यासाठी मदत करणे), आणि ३५१ (२) (जीवे मारण्याचा प्रयत्न) या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात वाद झाला होता. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर या क्रूर घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी नमूद केले.