मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय?
मुंबई : मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक जण मुंबईच्या उपनगरांत राहतात. अशा लाखो नागरिकांची मुंबईत घर घेण्याची इच्छा असते. पण मुंबईत घर घेणं तेवढं सोपं नाही. कारण मुंबईत घरांच्या किंमती या अक्षरश: गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जाईल का? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकारण क्षेत्र म्हणजेच म्हाडा आणि आता मुंबई महापालिका वरदान ठरले आहे. कारण अल्प आणि अत्यल्प घटकातील नागरिकांसाठी बाजारभावापेक्षा कमी दरात घरे उपलब्ध करुन देण्याचं काम या संस्था करतात. पण यांच्या घरांच्या किंमती बघितल्या की खरंच अल्प आणि अत्यल्प घटकातील नागरिकांना त्या परवडणा-या किंमतीत मिळणे शक्य आहे का, असा प्रश्न पडतो.
आतादेखील मुंबई महापालिकेकडून ४२६ फ्लॅट्सचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार या फ्लॅट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या ४२६ घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील झाली आहे.
आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत काढण्यात आली आहे. पण असं असलं तरी या फ्लॅट्सची किंमत तुलनेने जास्त असल्याने घर घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. म्हाडाच्या फ्लॅट्सपेक्षा ही घरे महाग असल्याने खरेदी करु इच्छिणाऱ्यांची निराशा झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुंबईत कोणत्या परिसरात किती दरांची घरे जाहीर करण्यात आली आहेत याची देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
मुंबई महापालिकेने लॉटरीसाठी जाहीर केलेल्या ४२६ फ्लॅट्सची किंमत ही वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळी अशी आहे. भायखळ्यातील फ्लॅट्सची किंमत १ कोटी आहे. मुंबईतल्या या फ्लॅट्सची किंमत साधारपणे अंदाजे ५४ लाखांपासून सुरु होते आणि ही किंमत १ कोटीपर्यंत जाते. विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी घराच्या किंमती या वेगवेगळ्या आहेत.
अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी घरांच्या किंमती
अल्प उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न ९ लाख असणाऱ्यांसाठी कांदिवलीत ४ घरे आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत ८१,७९,२१७ इतकी आहे. तर कांजूरमार्ग येथे २७ घरे आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत ९७,८६,३९२ इतकी आहे. अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथे १४ घरे आहेत. तिथल्या घरांची किंमत प्रत्येकी ७८,५०,९१० इतकी आहे.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी कुठे आणि किती किंमतीची घरे आहेत?
भांडूप पश्चिमेतील एलबीएस मार्ग येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी २४० घरे आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत ६३,५०,९८६ इतकी आहे. कांदिवली पूर्वेत ३० घरांची प्रत्येकी किंमत ६३,७७,१६२ इतकी आहे. दहिसर येथे ४ घरं आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत ६६,४०,०९० रुपये इतकी आहे.
भायखळाच्या प्रेस्टीज परिसरात ४२ घरे आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत १,०१,२५,१०९ इतकी आहे. जोगेश्वरी पूर्व येथे ४६ घरे आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत ५४,२७,४०४ रुपये इतकी आहे. तसेच गोरेगावच्या पिरामल नगर येथे १९ घरे आहेत. त्या घरांची प्रत्येकी किंमत ५९,१५,६०२ रुपये इतकी आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी घरांच्या किंमती
- भायखळा येथे ४२ घरे - किंमत १,०१,२५,१०९ रुपये
- कांजूरमार्ग येथे २७ घरे - किंमत ९७,८६,३९२ रुपये
- कांदिवलीत ४ घरे - किंमत ८१,७९,२१७ रुपये
- अंधेरी, मरोळ येथे १४ घरे - किंमत ७८,५०,९१० रुपये
अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरांच्या किंमती
- दहिसर येथे ४ घरे - किंमत ६६,४०,०९० रुपये
- कांदिवली पूर्व ३० घरे - किंमत ६३,७७,१६२ रुपये
- भांडूप पश्चिम २४० घरे - किंमत ६३,५०,९८६ रुपये
- जोगेश्वरी पूर्व येथे ४६ घरे - किंमत ५४,२७,४०४ रुपये
- गोरेगाव पिरामल नगर येथे १९ घरे - किंमत ५९,१५,६०२ रुपये
घरांसाठी अर्ज कसा करायचा?

या सर्व घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. https://bmchomes.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर अर्जदारांनी अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर असणार आहे. १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ५ वाजता अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होणार आहे. तसेच अर्ज शुल्क आणि ठेवी या १४ नोव्हेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यत स्वीकारल्या जाणार आहेत. यानंतर पात्र अर्जदारांची यादी १८ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल. तर २० नोव्हेंबरला सोडत काढली जाईल. तसेच २१ नोव्हेंबरला लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात येईल.