मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे काल (२५ ऑक्टोबर) वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सचिन पिळगावकर याने एक महत्वाचा खुलासा केला आहे.
सचिन पिळगावकरचा भावनिक खुलासा
सतीश शाह यांचे जिवलग मित्र आणि अभिनेता सचिन पिळगावकरने त्यांच्या निधनानंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, निधनाच्या काही तासांपूर्वीच सतीश यांनी त्याला मेसेज पाठवला होता.
सचिन म्हणाला, “आज दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी सतीशचा मेसेज आला होता. त्यावेळी तो अगदी ठणठणीत होता. पण काही तासांतच त्याच्या निधनाची बातमी आली आणि आम्हाला धक्का बसला.”
सचिनने पुढे सांगितले, “माझी पत्नी सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि त्यांची पत्नी मधुला भेटून आली होती. सतीशने गाणं लावलं आणि त्यावर सुप्रिया आणि मधु दोघीही नाचल्या होत्या. तो नेहमीप्रमाणे आनंदी आणि खुश होता.”
१९८७ साली आलेल्या ‘गंमत जंमत’ या मराठी चित्रपटात सचिन पिळगावकर आणि सतीश शाह यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली.
“त्या चित्रपटाने आमचं एकत्र येणं घडलं. त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र काम केलं नाही, पण आमची मैत्री कायम टिकली,” असे सचिन यांनी सांगितले.
सचिन पुढे म्हणाला, “सतीश नेहमीच आनंदी राहायचा आणि इतरांनाही हसवायचा. त्याने काही महिन्यांपूर्वी किडनी प्रत्यारोपण करून घेतले होते, जेणेकरून पत्नीची काळजी घेता येईल. त्यापूर्वी त्याची बायपास सर्जरीही झाली होती. दुर्दैवाने मधुलाही सध्या अल्झायमरचा त्रास आहे.”
सचिन शेवटी म्हणाला, “जीवन अनिश्चित आहे. कोणाची वेळ केव्हा येईल हे कोणी सांगू शकत नाही. पण सतीशने नेहमी आनंद पसरवला आणि तेच त्याचं खरं वैशिष्ट्य होतं.”