रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-गणेशखिंड मार्गावर घडलेल्या एका अपघातात एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने बसमधून खाली पडलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रियंका विनोद कुंभार (वय ३५, रा. दहिवली-कुंभारवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, त्या तीन दिवस मृत्यूशी झुंज देत होत्या.
गुहागर ते रत्नागिरी या मार्गावर रविवारी (१९ ऑक्टोबर) प्रियंका कुंभार या त्यांची मैत्रिण सविता करंजेकर यांच्यासोबत प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बस गुहागर-गणेशखिंड मार्गावर असताना अचानक एका खोल खड्ड्यात आदळली. या धक्क्याने बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रियंका कुंभार थेट रस्त्यावर फेकल्या गेल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार सुरू होते अखेर त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दहिवली परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात एसटी बसचा चालक आणि वाहक यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एसटी महामंडळाने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.