किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.
सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात झाला होता. सतीश शाह यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९७८ मध्ये 'अजीब दास्तां' या चित्रपटातून झाली असली तरी, त्यांना खरी ओळख मिळाली ती १९८३ मध्ये आलेल्या 'जाने भी दो यारों' या चित्रपटातून. हा चित्रपट नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत बनत होता. या 'डार्क कॉमेडी' चित्रपटात सतीश शाह यांना 'डिमेलो' नावाच्या एका व्यक्तीच्या मृतदेहाची भूमिका मिळाली होती.
ही भूमिका पडद्यावर फक्त काही सीन्सची नसून, संपूर्ण चित्रपटात त्यांना 'लाश' बनून राहायचे होते. पण याच 'मुर्दा' भूमिकेने सतीश शाह यांनी अक्षरशः पडदा गाजवला. 'लाश' बनूनही प्रेक्षकांना हसवायची त्यांची ही अभिनय क्षमता वाखाणण्याजोगी होती. हा चित्रपट आजही भारतीय सिनेमातील 'क्लासिक' म्हणून ओळखला जातो.
महाभारताचा 'चीरहरण' सीन असो किंवा ताबूत मधून अचानक कार चालवण्याच्या अवस्थेत दिसणे असो, प्रत्येक महत्त्वाच्या सीनमध्ये सतीश शाह हे प्रेक्षकांना हसायला लावून, संपूर्ण 'मैदान' जिंकून जायचे.
टीव्हीवर ५० वेगवेगळ्या भूमिका
फिल्मी दुनियेत छाप सोडल्यानंतर सतीश शाह यांनी टीव्हीवरही मोठा धमाका केला. त्यांनी 'साराभाई वर्सेस साराभाई' (इंद्रवदन साराभाई), 'नहले पे दहला' आणि 'फिल्मी चक्कर' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले.
पण 'ये जो है जिंदगी' या लोकप्रिय मालिकेत तर त्यांनी कहर केला होता. एकाच मालिकेत ते ५० हून अधिक वेगवेगळ्या आणि अविस्मरणीय भूमिकांमध्ये दिसले होते, आणि प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.
नावाजलेले चित्रपट
अजिब दास्तां, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, हम साथ साथ है, ओम शांती ओम, में हूँ ना, कहो ना प्यार है, कल हो ना हो, मुझसे दोस्ती करोगे, जुडवा आणि १०० हुन अधिक चित्रपटात त्यांनी काम केले.