मुंबई: मुंबईत प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. काळाचौकी परिसरात २४ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळच्या सुमारास मनीषा यादव हिच्यावर तिचा प्रियकर सोनू बराय याने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मनिषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मनिषावर हल्ला केल्यानंतर सोनूने स्वत:चे जीवन संपवले होते.
प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषावर सुरुवातीला केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या जखमा गंभीर असल्यामुळे तिला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लालबाग काळाचौकी परिसरात मनिषा यादव हिला सोनू बराय याने रस्त्यात बेदम मारहाण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मनिषा जवळच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये गेली. मात्र सोनू याने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच स्वतःचाही गळा चिरला. या घटनेनंतर त्या दोघांनाही तात्काळ केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी सोनू बराय याची तपासणी करताच मृत घोषित केले.
आंबेवाडी येथे राहणारा सोनू बराय या २४ वर्षीय तरुणाचे याच परिसरात राहणाऱ्या मनिषासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आठ दिवसांपूर्वी मनिषाचे अन्य कुणासोबत अफेयर असल्याचा संशयावरून दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रेकअप झाल्यानंतर सोनू मानसिक तणावात होता. याच तणावात असताना त्याने सकाळी मनिषाला भेटायला बोलावून तिच्यासोबत वाद घातला आणि नंतर तिच्यावर चाकूने वार केले. तसेच स्वतःचेही जीवन संपवले.