मुंबई (सचिन धानजी) : गोरेगाव (पश्चिम) एस व्ही रोडवरील ओशिवरा नाल्यावरील पुल पाडून नव्याने त्याची पुनर्बांधणी करण्याच्या कामांमध्ये तब्बल ९.५३ कोटींनी वाढ झाली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी २३ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर केले होते. पण आता त्याचा बांधकामाचा खर्च ३२.५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोणत्याही बांधकामाचा खर्च १५ टक्क्यांपेक्षा वाढीव फेरफारीच्या खर्चाला मान्यता न देण्याचे परिपत्रक असतानाही तब्बल ४० टक्क्यांपेक्षाही अधिक वाढीव खर्चाला मान्यता प्रशासनाने मान्यता दिल्याची माहिती समोर येत आहे.
गोरेगाव पश्चिम येथील ओशिवरा येथील नाल्यावरील पुलाचे बांधकामा तोडून नव्याने बांधकाम करण्यासाठी एप्रिल २०२१ रोजी विविध करांसह २३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. या कामासाठी एपीआय सिव्हीलकॉन कंपनीची निवड करण्यात आली होती. हे काम मंजुरीच्या १८ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु हे काम वेळेत पूर्ण झाले नाहीतच, शिवाय या पूल उभारणीचा खर्च ९ कोटी रुपयांनी वाढून विविध करांसह ३२ कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुलाचे काम सुरु असताना एम. एम. आर. डी. ए. यांच्याकडून राम मंदिर रस्ता पश्चिमेकडील ओ.डि.सी. (ओशिवरा डिस्ट्रिक्ट सेंटर) ते एस. व्ही. रोड येथील ओशिवरा नाल्यावरील महानगरपालिकेच्या पुलास जोडण्यासाठी नवीन पूल प्रस्तावित करण्यात आला. हे पूल हा ओशिवरा नदीवरील विद्यमान पुलास जोडणारे असल्याने नव्याने अतिरिक्त जोडमार्ग उपलब्ध होईल. या एम. एम. आर. डी. ए. च्या होव घातलेल्या पुलास पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या यांच्या सुधारित अभिप्रायानुसार नदीच्या तळापासून पुलाची उंची कमीत कमी ४.०७७ मीटर ठेवणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या ओशिवरा नाल्यावरील पुलाच्या सुपरस्ट्रक्चरमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि स्ट्रक्चरच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या कामाचे तांत्रिक सल्लागार .टी.पी. एफ इंजिनअरींग प्रा. लि. यांनी पी.एस.सी. गर्डर ऐवजी स्टील गर्डर बाबत आराखडे तयार करून सादर केले आहेत. त्यामुळे सदर कामाच्या खर्चात वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जास्तीच्या कामांसाठी ११.३९ कोटी रुपयांचा वाढीव खर्च होता. त्यातील काही बाबींमध्ये काटछाट केल्यानंतर यासाठीचा खर्च हा ७.८१ कोटी तसेच विविध करांसह ९ कोटी रुपये वाढला गेला आहे.