योगियांची दिवाळी

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके


दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ही दीपावली सर्वांना आरोग्यदायी आणि मनाला समाधान देणारी असो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. भारताच्या कानाकोपऱ्यांत विविध पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. सण साजरा करायच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सगळीकडे आढळणारा या सणातील समान धागा म्हणजे दीपपूजन, दिव्यांची आरास, दिव्यांनी देवांना, तसेच घरातील लहान मुलं, भाऊ, पती यांना ओवाळणं. दिवाळी हा शब्दच मुळी दीप शब्दावरून आला आहे. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग, दिव्यांची आरास.एकूणच दिवाळी म्हणजे तेजाचा उत्सव.
नवरात्र संपलं की आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. हळूहळू दिवाळीपूर्व कामं सुरू होतात. ज्यामध्ये मुख्य काम असतं ते म्हणजे घर स्वच्छ करणं, घराला रंगरंगोटी करणं, जुन्या वस्तू टाकून देणं, नव्या वस्तूंची खरेदी करणं. एरवी घरात न होणारे फराळाचे पदार्थ विशेष निगुतीनं करणं, दिव्यांची आरास करण्यासाठी घरातील पणत्या, धातूंचे दिवे स्वच्छ करून उजळणं आणि अशी कितीतरी. दिवाळीच्या निमित्तानं केलेल्या या कामांतून जणू काही येणाऱ्या वर्षासाठी आपण घरादाराचं पुनरुज्जीवनच करत असतो.


सख्यांनो, तुम्ही म्हणाल. अहो, आपलं सदर योगविषयक आहे ना? तुम्ही तर दिवाळीचंच वर्णन करताय. आज दीपावलीचं रूपक योजून योगविषय मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी योग्याच्या दिवाळीचं फार सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात


मी अविवेकाची काजळी
फेडूनी विवेकदीप उजळी।
ते योगिया पाही दिवाळी
निरंतर।


अविवेकाची काजळी दूर करून विवेकदीप उजळणं ही  योगीजनांची निरंतर दीपावली असते. वर मी वर्णन केलंय ते बाह्य दीपावलीचं; परंतु योगीजनांची दीपावली आंतरिक असते. ती कशी? ज्याप्रमाणे दिवाळीच्या आधी घर स्वच्छ केलं जातं त्याप्रमाणेच मन स्वच्छ करणंही तितकंच आवश्यक आहे. आपल्या मनात कोणातरीविषयी असलेला राग, रुसवा असूया, मत्सर, आजच्या जगात विशेषकरून आपल्या  मनात असलेली स्पर्धेची भावना, त्यातून आलेली असुरक्षितता, इत्यादी सर्व भावना ही मनावर साठलेली धूळच आहे. याशिवाय नको असलेल्या कितीतरी अनावश्यक चिंता मनात घर करून असतात. त्या पटकन दूर न होणाऱ्या जळमटांसारख्या असतात. घरातील धूळ आपण केरसुणीने काढून टाकतो त्याप्रमाणे
मनावर साचलेली ही धूळ, जळमटं, मळ साफ करायचा तर त्यासाठी सकारात्मक भावनांचं फडकं आणि विवेकी विचारांचा साबण हवा. घर स्वच्छ झालं तरी आपल्याला खूप समाधान मिळतं तर मन स्वच्छ झाल्यावर किती आनंद मिळेल याची कल्पना आपल्याला करता येईल.


जुन्या वस्तू टाकून आपण नव्या वस्तू घेतो त्याप्रमाणे निरुपयुक्त विचार दूर करून त्यांची जागा आनंददायी सकस विचारांनी घेतली तर जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलेल. अशा समाधानकारक भावना आणि विचार मनात आणि बुद्धीत रुजले तर काय बहार येईल? बिनसलेली नवी नाती पुनरुज्जीवित होतील. योग्य विचारांकडे वाटचाल सुरू झाली की अडचणींतून बाहेर पडण्याचे नवे मार्गं दिसू लागतील. समस्यांचं मळभ दूर होऊ लागेल.
स्वच्छ घरात जसा अधिक प्रकाश पसरतो. काचेवरची काजळी दूर केली की पारदर्शक काचेतून दिवा जसा अधिक उजळतो आणि त्याचा प्रकाश सर्व दिशांना पडतो त्याप्रमाणे सकारात्मक भावना आणि सकस विचार यांनी भविष्यातील मार्ग उजळून निघतील. स्वयंप्रकाशी दिव्याप्रमाणे आपलं मन आणि बुद्धी आपली आपल्यातच समाधानी शांत आणि आनंदी राहील. बाह्य दिवाळी आपण साजरी करतोच; परंतु ही आंतरिक दिवाळी अधिक महत्त्वाची. कारण नवे कपडे, फराळाचे जिन्नस, फटाके कधीतरी संपणार आहेत; परंतु मनात लागलेला विवेकी विचारांचा दीप मात्र एकदा प्रज्वलित केला तर नित्य तेवत राहील. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आतून, बाहेरून उजळत राहील. या विवेकदीपाचा प्रकाश नित्य पडत राहील. आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवत राहील.दीप, प्रकाश ही भारतीय तत्त्वज्ञानानुसार ज्ञानाची आंतरिक जाणीव जागृत झाल्याची, तेजाची प्रतीकं आहेत, तर अंधार, धूर, धूळ ही अज्ञानाची, आपल्या मनावर झालेल्या अनावश्यक संस्कारांची प्रतीकं आहेत. म्हणूनच अभ्यंग स्नान करताना शरीरावरील मळ दूर होतो त्याप्रमाणे विवेकज्ञानानं मनाचा मळही दूर करण्याचा प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थानं योगदृष्ट्या दीपावली आहे. संस्कृतमध्ये एक वचन आहे "आत्मदीपो भव" तू स्वतः स्वतःसाठी दीप हो. अंतरीचा ज्ञानदीप उजळणं ही खरी दिवाळी.


देहाचीये पात्रात
सद्भावनांचा स्नेह ।
विवेकाची ज्योत
ज्ञानाचा प्रकाश।। चिरंतन ।

Comments
Add Comment

नाचणीचे बिस्कीट

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे दिवाळीचा फराळ म्हटलं की गोड, तूप, साखर आणि सुगंध यांचा संगम आठवतो. पण आजच्या

रंगभूमीची तेजस्विता

कर्तृत्ववान ती राज्ञी  : ‘पद्मश्री नयनाताई अपटे-जोशी’ भारतीय कला-संस्कृतीचा पट जितका रंगीबेरंगी आहे, तितकाच

गर्भावस्थेतील मातृ स्थूलता आणि तिचा परिणाम

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भावस्था ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची अवस्था असते. या

तिच्या मनातील पाडवा

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर फक्त प्रेम, सन्मान आणि आपुलकीचा दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, प्रेम आणि एकत्रतेचा सण. या

तरुणाईची ‘नेल एक्सटेन्शन’ची फॅशन!

आजच्या तरुणाईमध्ये नेल एक्सटेन्शन हा फॅशन आणि सौंदर्याचा नवा ट्रेंड झपाट्याने लोकप्रिय होत आहे. आकर्षक आणि

पुनःपुन्हा होणारा गर्भपात

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंददायक आणि भावनिक घटना