शार्लोट चेस सेंटर : प्रसिद्ध अमेरिकन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ऑनलाइन प्रशिक्षक डॅनियल नारोडित्स्की यांचे वयाच्या केवळ २९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. शार्लोट चेस सेंटर जिथे ते मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनीच निधनाची माहिती दिली. नारोडित्स्की यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
कॅलिफोर्नियातील बे एरिया येथे जन्मलेले नारोडित्स्की यांनी वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली. लवकरच त्यांची प्रतिभा उजळून निघाली. त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय शालेय स्पर्धा जिंकल्या, आणि पाचवीत असताना कॅलिफोर्निया K-12 स्पर्धा जिंकून सर्वांत तरुण विजेता बनले. त्यांनी २००७ मध्ये १२ वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ विजेतेपद पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर त्यांनी ग्रँडमास्टर होण्यासाठी तयारी सुरू केली आणि बुद्धिबळाच्या जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
बुद्धिबळासाठी एक वर्षाची विश्रांती घेतल्यानंतर नारोडित्स्की यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि २०१९ मध्ये इतिहास विषयात पदवी मिळवली. वयाच्या १४व्या वर्षीच त्यांनी पहिले बुद्धिबळ पुस्तक प्रकाशित केले. यानंतर त्यांनी Chess Life मासिकासह अनेक प्लॅटफॉर्मवर लेखन केले. त्यांची २०२२ मध्ये न्यू यॉर्क टाईम्समध्ये बुद्धिबळ स्तंभलेखक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नारोडित्स्की यांनी YouTube आणि Twitch या माध्यमांद्वारे बुद्धिबळाचे थेट प्रक्षेपण आणि प्रशिक्षण देत लाखो लोकांपर्यंत पोहोचून खेळ आणखी लोकप्रिय केला. नारोडित्स्की यांच्या YouTube चॅनेलवर जवळपास ५ लाख सबस्क्रायबर्स होते, तर Twitch वर ३.४ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांच्या सत्रांमध्ये ते प्रेक्षकांना प्रत्यक्ष खेळातील क्लिष्ट चाली समजावून सांगत, आणि बुद्धिबळातील गूढतेला सहजतेने उलगडत. त्यामुळे नवशिक्यांपासून अनुभवी खेळाडूंपर्यंत अनेकांना त्यांनी प्रभावित केले.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) आणि Chess.com यांनी नारोडित्स्की यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या बुद्धिबळ क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले आहे. २०२५ यूएस चेस चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात त्यांच्या सन्मानार्थ एक मिनिट मौन पाळून करण्यात आली. सेंट लुईस बुद्धिबळ क्लब ने त्यांना "बुद्धिबळ समुदायाचा आधारस्तंभ" असे गौरवपूर्वक संबोधले. शार्लोट चेस सेंटरने सांगितले की नारोडित्स्की यांच्या कुटुंबीयांनी या कठीण काळात गोपनीयतेची विनंती केली आहे.