पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत असून एक नवीन प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात पैशांसाठी फायटर कोंबड्याचा वापर करून जुगार खेळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलीसांनी सहा जणांना रंगेहात पकडले आहे. कोंबड्यांमध्ये झुंज लावून त्यांच्यावर पैसे लावले जात होते. हा एक जुगाराचाच प्रकार आहे.
पुण्याच्या वानवडी परिसरात हा प्रकार घडत आहे, याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. अमोल सदाशिव (रा. रविवार पेठ), मंगेश आप्पा चव्हाण (रा. भवानी पेठ), निखिल मनिष त्रिभुवन (रा. घोरपडी), अमिर आयुब खान (रा. घोरपडीगाव), सचिन सदाशिव कांबळे (रा. भवानी पेठ) आणि प्रणेश गणेश पॅरम (रा. कॅम्प) या सहा जणांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून सहा रंगीत फायटर कोंबडे, तीन मोटारसायकल, पाच मोबाईल फोन आणि दोन हजार पाचशे ऐंशी रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख अकरा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोंबड्यांना झुंजीसाठी वापरताना त्यांना क्रूरपणे वागवले जात असल्याचेही पोलीसांच्या लक्षात आले. त्यामुळे आता आरोपींवर आणखी कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
या कारवाईनंतर सर्व आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(ब) आणि प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणारा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर माहितीसाठी आरोपींचा पुढील तपास सुरू आहे.