आदित्य कांबळे यांचा ‘दिया फॉर युनिटी’ उपक्रम आज खारघरमध्ये उजळणार
नवी मुंबई : खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदान, सेक्टर 19 येथे आज मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9.00 वाजता “दिया फॉर युनिटी – एक दिवा एकतेचा” हा दीपोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विविध मान्यवर मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सुमारे दीड लाख दिव्यांच्या प्रकाशाने मैदान उजळून निघणार आहे.
या दीपोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, एकही रुपयाची वर्गणी न घेता, कोणत्याही व्यक्तीकडून पैसा न मागता, स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते यांनी घराघरातून दिवे, तेल आणि साहित्य आणून दिले आहे.
या उपक्रमात जातीभेद न करता सर्व हिंदू समाज घटकांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्धआणि अनुशासनबद्ध रितीने राबवण्यात आला आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य विठ्ठल कांबळे हे असून, समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
या दीपोत्सवामुळे समाजमनात एकतेचा संदेश आणि सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ होत आहे.