बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप
संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली असून हे दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लक्ष्मीपूजन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात यांचा हे पक्षातील सर्वात सिनियर नेत्यांपैकी एक नेते आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ते बडे प्रस्थ आहेत. त्याशिवाय बाळासाहेब थोरात यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. एक दिग्गज राजकारणी म्हणून त्यांची छवी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जाते.
बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्ष संगमनेरचे प्रतिनिधित्व केले. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. हा पराभव अनेकांना धक्का देणारा होता.
यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, संगमनेर मतदारसंघात साडे नऊ हजार दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही. आम्हाला तहसीलदरांनी उत्तर दिले आहे की, असे कोणतंही नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही.
एका बाजूला तुम्ही सांगता की, आम्ही आदेश दिला आहे. चुका दुरुस्त करणार आहोत. दुसऱ्या बाजूला सांगताय की, आम्हाला अधिकारच नाही. असा हा बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि हे अधिकारी करत आहेत का? ही शंका यावी अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.