नाशिक : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेल्या आणि बिहारच्या रकसोलकडे जात असलेल्या कर्मभूमी एक्स्प्रेसमधून (गाडी क्रमांक १२५४६) तीन युवक खाली पडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री नाशिक रोडजवळ घडली. या दुर्घटनेत दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, तिसरा युवक गंभीर जखमी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी सायंकाळी कर्मभूमी एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकावर न थांबता पुढे गेली. काही वेळाने ओढा स्थानकाचे स्टेशन मास्तर आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला माहिती दिली की, ढिकलेनगर, हनुमान मंदिराजवळ रेल्वेतून तीन युवक खाली पडले.
या माहितीनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी, हवालदार भोळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. किलोमीटर १९०/१ ते १९०/३ या रेल्वे मार्गादरम्यान (पटरी) दोन युवक मृतावस्थेत तर एक युवक गंभीर अवस्थेत आढळून आला. जखमीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.
सध्या दिवाळीचा काळ सुरू असल्याने उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, गाडीत जागा नसल्याने दरवाजाजवळ उभे असलेले युवक धक्क्याने खाली पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे युवक दिवाळीसाठी गावी जात होते की बिहारमधील निवडणुकीसाठी प्रवास करत होते, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी व मृत युवकांकडे कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रे सापडलेली नाहीत. जखमी युवकाला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच साईनाथ नगर भागातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही प्रवाशांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी आरडाओरडा केला, ज्यामुळे इतर प्रवासी आणि नागरिक सतर्क झाले.
रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनी ही दुर्घटना नाशिक रोड रेल्वे स्थानक प्रशासनाला कळवली. यानंतर रेल्वे पोलीस आणि नाशिक रोड पोलीस दोघांनी घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू आहे.