स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचे शारिरीक त्रासामुळे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेत पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरुन काढण्यासाठी मालिकेत आता पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी रोहिणी हट्टंगडी यांची निवड करण्यात आली आहे.
ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी या भूमिकेला चांगल्या उंचीवर नेले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल फार प्रेम निर्माण झाले होते. मालिकेत आता पूर्णा आजीची भूमिका रोहिणी हट्टंगडी करणार असल्यामुळे त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षक कशी पसंती देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्णा आजीच्या एण्ट्रीने मालिकेच्या सेटवरही आनंदाचे वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी हट्टंगडी यांचे मनापासून स्वागत केले. तर यापूर्वी रोहिणी हट्टंगडी यांनी 'होणार सून मी ह्या घरची' या झी मराठीवरील मालिकेत आजीची भूमिका केली होती.
रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, 'एखादी भूमिका एखाद्या कलाकाराने साकारलेली असते. लोकांच्या मनात त्याच कलाकाराची इमेज असते. दुसरं कोणीतरी त्या जागी आल्यावर काहींना ते आवडतं तर काहींना आवडत नाही. पण साधारणपणे त्या भूमिकेचा बाज कायम ठेवून अगदी तशीच ती भूमिका होणार नाही कदाचित कुठे कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे माझ्या मनात आज संमिश्र भावना आहेत. हे मी पहिल्यांदाच करत आहे. लोकांना आवडेल की नाही हा मोठा प्रश्न मनात आहे. पण मराठी प्रेक्षकांना विचारात घेता आजपर्यंत माझा अनुभव आहे की मराठी प्रेक्षक खूप दिलदार आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे नक्कीच ते स्वीकारतील. मला खूप आनंद होईल.''