नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा - बाबदेव जिल्हा परिषद क्षेत्र, धामणगाव येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, यावेळी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट दिली जाणार नाही. तर गावातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील कार्यकर्त्याला तिकीट दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत शासनाच्या योजना पोहचवा. विकास कामे करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणा तरच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला निधी योग्य तऱ्हेने आपल्या भागात विकासकामांवर खर्च होईल. काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर विकासाचा बट्ट्याबोळ करतील.
आमचे सरकार हे लोक कल्याणकारी सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या जीवनाश्यक वस्तूंवरील कर कमी केला. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे जीवन सुकर होणार आहे. आपण भाजपला दिलेले मत किती महत्त्वाचे आहे याचा प्रत्येय आपल्याला आला असेल. जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते पूर्ण करणार आहोत. ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली जाणार आहे.
लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, शेतकऱ्यांकडून मोटार पंपाचे वीजबिल घेणार नाही, सर्वसामान्य ग्राहकांची वीज दरवाढ करणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द आम्ही पाळणार आहेत. महसूल विभागाचा मंत्री म्हणून मी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करा, यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन श्री. बावनकुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी माजी आ.टेकचंद सावरकर, भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल, शहराध्यक्ष मोरेश्वर सोरते, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.