विशेष : ऋतुजा राजेश केळकर
‘दीपशृंखला उजळे अंगणा,
आनंदाची वृष्टी होई।
स्नेहसंबंध जुळती नव्याने,
प्रेमाची गंध फुलवी॥
लक्ष्मीपादस्पर्शाने घर,
समृद्धीचा साज चढे।
शुभेच्छांचे दीप उजळती,
मंगलमय दीपोत्सव घडे॥’
शब्दांची रांगोळी माझ्या हातून कागदावर उतरता उतरता त्याचा अंगणात दीपांची रांग उजळते जणू प्रकाशाचे मोती जमिनीवर विखुरले गेलेत. त्या तेजात आनंदाची सळसळती वृष्टी होते, जी मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात झिरपत जाते. प्रत्येक दिवा स्नेहाचा नवा धागा विणतो आणि त्या प्रकाशात प्रेमाचा गंध दरवळतो जणू कोवळं फूल मनातल्या शांत बागेत उमलतं. जिथे लक्ष्मीच्या पावलांनी घरात समृद्धीचं पावित्र्य उतरते तिथे प्रत्येक कोपरा तिच्या स्पर्शाने उजळतो, मग शुभेच्छांचे दीप एकमेकांशी बोलू लागतात आणि त्यांच्या तेलमय वातींतून संवाद झिरपत राहतो आणि त्या संवादातून साकारतो एक मंगलमय दीपोत्सव जिथे प्रकाश फक्त बाहेरच नाही, तर अंतर्मनातही साजरा होतो, हा अर्थ देखील मनाच्या अंगणात सहज रांगोळी रेखून गेला.
माझ्या शब्दात ‘दिवाळी’चा अर्थ फारच वेगळा आहे पाहा बर पटतोय का. दिवाळी या शब्दाची सुरुवातच ‘दि’ने होते आणि त्या अक्षरातच लपलेली आहे एक गूढ शक्ती ‘दिग्विजयाची’. हा सण केवळ प्रकाशाचा नाही तर, तो अंधारावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव आहे. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात दीप लावून आपण जणू जीवनाच्या प्रत्येक दिशेला उजळतो भयावर, दुःखावर आणि अस्थिरतेवर विजय मिळवतो. दिव्यांच्या त्या रांगोळीत दिशा हरवलेल्या मनाला मार्ग सापडतो आणि त्या प्रकाशात साकारतो एक ‘आत्मविजय’. लक्ष्मीचा पावित्र्यस्पर्श केवळ धनसंपत्तीचा नाही तर, तो मनाच्या समृद्धीचा संकेत आहे जिथे, विचार, भावना आणि कृती यांचं एकत्व घडतं. दिवाळी म्हणजे ‘दिग्विजयाचा आरंभ’ जिथे प्रत्येक दिवा एक यशाची दिशा दाखवतो आणि प्रत्येक शुभेच्छा मनाच्या आकाशात नवा तारा उजळते.
दिवाळीच्या नावातला ‘वा’ म्हणजे जणू वाटेवरचा प्रवासी जो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मार्गक्रमण करत आहे. हा प्रवास केवळ भौतिक नाही, तर तो आत्म्याचा आहे. प्रत्येक जन्म म्हणजे एक ‘नवे वळण’ आणि प्रत्येक मृत्यू म्हणजे एक ‘थांबा’ जिथे पुन्हा नव्याने सुरुवात होते. ही वाट सरळ नसते, ती वळणदार असते, ‘अनुभवांनी भरलेली तसेच भावनांनी ओथंबलेली’. सात्त्विकतेच्या दिव्यांच्या प्रकाशात हा वाटसरू स्वतःला शोधतो आणि मग आपल्या कर्माच्या तेजात न्हाऊन अनुभवांच्या वातींनी उजळत जातो. त्याच्या पावलांखाली स्नेह, श्रद्धा आणि समर्पणाचे दीप रचलेले असतात. तो कायम चालत राहतो. कधी थांबतो, कधी हरवतो, कधी स्वतःच्या सावलीतच गोंधळतो पण, प्रत्येक दिवाळी त्याला आठवण करून देते की, ‘प्रकाश हेच अंतिम ध्येय आहे आणि अंधार हा केवळ एक टप्पा आहे, अंतिम सत्य नव्हे’. म्हणूनच ‘दिवाळी’ म्हणजे त्या वाटसरूचा एक थांबा असतो, जिथे तो स्वतःच्या कर्मांची उजळणी करतो आणि पुन्हा नव्या तेजाने पुढे निघतो. हे तेज म्हणजेच त्याचा आत्मप्रकाश आणि ही वाट म्हणजेच जीवनाची लीला. त्या लीलांमध्ये प्रत्येक दीप एक दिशा दाखवतो आणि प्रत्येक वळण एक शिकवण देतो ज्यामुळे दिवाळीच्या त्या प्रकाशात वाटसरू केवळ चालत नाही तो जागृत होतो, उजळतो आणि पुन्हा नव्याने जन्म देखील घेतो नव्या दीपोत्सावाकरिता.
‘ली’ म्हणजे ‘लिपी’ जीवनाची, नियतीची आणि ईश्वरी संकेतांची अदृश्य पण अनुभूतीशील रचना. दिवाळीच्या नावातली ‘ली’ म्हणजे जणू एक अदृश्य लिपी असते जी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणावर, प्रत्येक श्वासावर, एक अर्थ कोरते. ती लिपी केवळ शाईने लिहिलेली नसते, ती कर्मांनी, भावनांनी आणि नात्यांच्या रेशीमगाठींनी विणलेली असते. ती वाचता येत नाही, पण ती जाणवते दीपांच्या प्रकाशात, रांगोळीच्या रेषांमध्ये. हा ‘वाटसरू’ जो ‘दि’च्या दिग्विजयातून आणि ‘वा’च्या जीवनप्रवासातून पुढे आला आहे, तो आता या ‘ली’च्या लिपीत स्वतःचं अस्तित्व शोधतो. त्याला वाटतं की, प्रत्येक दीप म्हणजे एक शब्द आहे, प्रत्येक रंग म्हणजे एक भावना आणि प्रत्येक नातं म्हणजे एक ओळ जी मिळून त्याच्या जीवनाची लिपी घडवते. ही लिपी कधी स्पष्ट असते, कधी धूसर; कधी गहिरा अर्थ सांगते, तर कधी फक्त शांततेचा स्पर्श देते. त्या सप्तरंगी रांगोळीच्या रेषांमधून, त्या तेजस्वी दीपांच्या उजेडातून आणि न सुटणाऱ्या नात्यांच्या रेशीमगाठींतून तो त्या लिपीचा अर्थ शोधू लागतो. ती लिपी त्याला सांगते की, प्रकाशातच अर्थ आहे आणि त्या अर्थातच ईश्वर आहे, कारण जेव्हा मन उजळतं तेव्हा शब्द नव्याने उमटतात. जेव्हा भावना पाझरतात, तेव्हा ही लिपी स्वतःच बोलू लागते. म्हणूनच माझ्या मते ‘दिवाळी’ म्हणजे केवळ सण नाही ती आपल्या ‘जीवनलिपीची उजळणी’ आहे. जिथे आपण आपल्या कर्मांची पुनर्रचना करतो, नात्यांची पुनरावलोकन करतो आणि आत्म्याच्या गाभ्यातून उमटणाऱ्या प्रकाशाच्या ओळी पुन्हा एकदा वाचतो. ही उजळणी म्हणजेच ‘आत्मप्रकाशाचा उत्सव’ आहे जिथे, आपण स्वतःला नव्याने ओळखतो, नव्याने लिहितो तसेच नव्याने जगतो देखील.
म्हणूनच माझ्या हृदयपटलावर कायमच दिवाळी म्हणजे केवळ दीपांचा उत्सव नाही तर ती एक अर्थांची रांगोळी आहे. जिथे ‘दि’च्या दिग्विजयात यशाची दिशा आहे, ‘वा’च्या वाटचालीत जीवनप्रवासाची गूढता आहे तर ‘ली’च्या लिपीत आत्म्याच्या गाभ्यातून उमटणारा प्रकाश आहे. या तीन अक्षरांनी विणलेली दिवाळी म्हणजे एक ‘मोरपंखी रांगोळी’ जिथे प्रत्येक रंग एक भावना आहे, प्रत्येक वळण एक शिकवण आहे आणि प्रत्येक दीप एक शब्द आहे. या रांगोळीत स्नेहाचे रंग आहेत, समर्पणाचे वळण आहे आणि आत्मप्रकाशाची झळाळी आहे.
ती रांगोळी केवळ अंगणात नाही, ती मनात सजते की जिथे, विचारांचे मोती, भावनांचे कण आणि नात्यांचे रेशीमगाठी एकत्र येऊन जीवनाची उजळलेली लिपी रेखाटतात. दिवाळी म्हणजे ‘त्या लिपीची उजळणी’ जिथे आपण स्वतःला नव्याने ओळखतो, नव्याने लिहितो आणि नव्याने जगतो. म्हणूनच, ही दीपशृंखला केवळ उजळतच नाही, तर ती
मनाच्या गाभ्यात एक इंद्रधनुषी रांगोळी रेखते, जी काळाच्या पटलावर कायमस्वरूपी झळकते.