मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये दूध, खवा/मावा, खाद्यतेल, तूप, मिठाई, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, भगर व अन्य अन्नपदार्थांचे एकूण ४ हजार ६७६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या तपासणीत अनियमितता आढळलेल्या एक हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले तर एका आस्थापनेचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
जनतेस सुरक्षित, दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार व आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासना विभागांमार्फत राज्यात सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
नागरिकांनीही सणासुदीच्या काळात अन्नपदार्थ खरेदी करताना गुणवत्ता, पॅकिंगवरील माहिती आणि परवाना क्रमांक यांची खात्री करूनच खरेदी करावी. भेसळीबाबत संशय आल्यास जवळच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.