मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू झाली आहे. यात पक्षांतराला सुद्धा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: राजन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा लढवल्या. यावेळी महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. मात्र आता महायुतीमधील नेते एका घटक पक्षातून दुसऱ्या घटक पक्षात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र पक्ष म्हणुन लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकते दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीतून पक्षांतर निर्णय घेतल्याचे लक्षात येते.
माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर पाटलांनी टीका केली आहे. मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर नेम साधला. तसेच माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे ते देखील भाजपमध्ये येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.