मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवाळीमध्ये खरेदी किंवा बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा ट्रेनचा फटका बसणार आहे. मध्य रेल्वेने हा मेगाब्लॉक विद्याविहार ते ठाणे या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट दिवाळीमुळे पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही.
मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १.३० दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळात लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमटी - चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४.४० दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळेत सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटीहून वांद्रे आणि गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत.
तर पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ९.५३ पासून ते दुपारी ३.२० पर्यंत बंद राहतील. तर गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी १०.४५ पासून ते सायंकाळी ५.१३ पर्यंत बंद राहणार आहेत.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार असुन ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेतून सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.