नाशिक: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाच्या 'तेजस एमके 1 ए' च्या तिसऱ्या उत्पादन लाइनचे आणि 'हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40' च्या दुसऱ्या उत्पादन लाइनचे उद्घाटन शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. हे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अत्याधुनिक विमानाचे उड्डाण हे संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक आहे, असे गौरवोद्गार संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात केले.
या कार्यक्रमा दरम्यान संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकभरात संरक्षण क्षेत्रात झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकला. एकेकाळी महत्वाच्या लष्करी हार्डवेअरची आयात करणारा देश आता स्वतःच्या भूमीत उपकरणे तयार करत आहे. तसेच आगामी काळात उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन १००% पर्यंत वाढवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
"भारत स्वावलंबनाशिवाय खऱ्या अर्थाने सुरक्षित होऊ शकत नाही. त्यामुळे स्वदेशीकरणावर भर दिला गेला. यासाठी अनेक आव्हानं समोर होती. मात्र महत्त्वाच्या उपकरणांसाठी आणि अत्याधुनिक प्रणालींसाठी इतरांवर अवलंबून राहायचे नाही हे ध्येय असल्यामुळे आव्हानांना सामोरे गेलो. त्याचा परिणाम आज दिसून येत आहेत. आम्ही केवळ आयातीवरील अवलंबित्व कमी केले नाही तर स्वदेशीकरणासाठीची आमची वचनबद्धता देखील मजबूत केली", असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.