मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची मंडई आणि सेवा निवासस्थान असलेल्या बाबू गेनू मंडईचा पुनर्विकास झाल्यांनतर आता या मंडईच्या जागेमध्ये महापालिकेच्या ई विभाग कार्यालयातील काही विभाग स्थलांतरीत करण्यात आले आहे. परंतु बाबू गेनू मंडईच्या जागेत महापालिकेची कार्यालये स्थलांतरीत केली जात असली तरी प्रत्यक्षात याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा नसल्याने याठिकाणी हलवण्यात आलेल्या विभागांमधील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे सेवा सुविधांचा अभाव तर आहेतच, परंतु याठिकाणी कार्यरत विभागातील कर्मचाऱ्यांना आपले फेस बायोमेट्रीक हजेरीसाठी माझगाव ते भायखळा ई विभाग कार्यालय असे द्रविडी प्राणायम करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सेवा सुविधा नसताना बाबू गेनू मंडईमध्ये विभाग स्थलांतरीत करण्याची एवढी घाई का होती असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
महापालिकेच्या ई विभाग कार्यालयांमध्ये असलेल्या मालमत्ता विभाग, सुरक्षा विभाग, दुकान आणि आस्थापने विभाग आदी विभागांचा कारभार २२ ऑक्टोबर २०२५ पासून माझगाव येथील बाबू गेनू मंडईच्या पुनर्विकास केलेल्या नवीन इमारतीच्या वास्तूमध्ये स्थलांतरीत करणयात आला आहे. याठिकाणी सुरक्षा विभागाचा कारभार हलवण्यात आला असला तरी या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारची महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाच नाही.

याठिकाणी तीन लिफ्टची सुविधा आहे, परंतु त्यातील एकही लिफ्ट कार्यान्वित झालेली नाही. याठिकाणी टेबल आणि खुर्च्या या जुन्या देण्यात आल्या आहे. एकाबाजुला घोडपदेव येथील कार्यालयामध्ये नवीन फर्निचर दिलेले असताना याठिकाणच्या विभागांसाठी जुन्याच खुर्च्या आणि टेबलची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मालमत्ता विभागाकडे जुना दस्तावेज असतो. जो फार महत्वाचा असतो. पण तोही कपाटे नसल्याने उघड्यावरच पडलेला असल्याने भविष्यात यापैंकी काही फाईल्स गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.