मुंबई: मुंबईतील सर्वात लोकप्रिय खरेदीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या दादर मार्केटने, दिवाळीपूर्वी खरेदीदारांचा महासागर स्वरूप धारण केले आहे. बाजारपेठेत उसळलेल्या या तुडूंब गर्दीमुळे गंभीर सुरक्षा, चिंता आणि महापालिकेच्या व्यवस्थापनावर तीव्र टीका होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये अरुंद बाजारपेठेतील गल्ल्यांमध्ये हजारो लोक खचाखच भरलेले दिसत आहेत, ज्यामुळे चेंगराचेंगरीची भीती निर्माण झाली आहे. सणासुदीची प्रचंड खरेदी, अरुंद रस्ते आणि फेरीवाल्यांनी व्यापलेले फूटपाथ यामुळे बाजारपेठेच्या अनेक भागांतून चालणेही जवळपास अशक्य झाले आहे.
दरवर्षी अशीच परिस्थिती असूनही, प्रशासनाने प्रभावी गर्दी नियंत्रण उपाययोजना लागू केलेल्या नाहीत, याबद्दल स्थानिक रहिवाशांनी तीव्र निराशा व्यक्त केली. खरेदीदार आणि परिसरातील रहिवासी या दोघांनीही या परिस्थितीला तणावपूर्ण, अव्यवस्थित आणि संभाव्य धोकादायक असे वर्णन केले आहे.
अनेक नागरिक शेवटच्या क्षणी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करत असताना, सोशल मीडियावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
अनेक वापरकर्त्यांनी या गैरव्यवस्थापनाचा निषेध केला तर दुसरीकडे, काही जणांनी हे गजबजलेल्या मुंबईच्या उत्सवी उत्साहाचे प्रतिबिंब असल्याचे मानले.
या उत्साही गर्दीमुळे शहराच्या दिवाळी मूडमध्ये रंगत आणि ऊर्जा भरली आहे, असे काहींनी मत व्यक्त केले, तर काहींनी दादरच्या पारंपरिक बाजारपेठेच्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला. या सणाच्या काळात स्थानिक मराठी व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहनही अनेकांनी केले.